महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यातील ‘या’ बाजारात कांदा बाजारभावात तब्बल एक हजार रुपयांची घसरण!

Tejas B Shelar
Published:
Onion News

Onion News : सध्या दीपोत्सवाचा सण मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र याच दीपोत्सवाच्या अर्थातच दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याचे दर कमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजार भावात मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे दर तेजीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत होता. निवडणुकीच्या आधी अगदी कवडीमोल दरात कांदा विकावा लागला असल्याने आता या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना वसूल करता येणार होती.

पण अशा या परिस्थितीतच गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली असल्याने दरात एक हजार रुपयांची घसरण झालीये. मागील आठवड्यात अडीच हजार रुपयांचा सरासरी भाव मिळणारा कांदा मंगळवारी १५०० रुपये क्विंटल दराने विकला गेला.

सोलापूर एपीएमसी प्रशासनाच्या माध्यमातून आवक वाढली असल्याने बाजार भाव कमी झालेत अशी माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी बाजार समितीत तब्बल ७८० गाड्या कांदा आला होता.

त्या कांद्याला सरासरी भाव दीड हजार रुपये तर सर्वाधिक दर चार हजारांपर्यंत मिळाला. तसेच ज्या कांद्याचा दर्जा घसरलेला आहे त्या कांद्याला फक्त 200 ते 1200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय.

दरम्यान येत्या काही दिवसांनी बाजारात नवीन कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे त्यांचा कांदा नोव्हेंबरमध्ये बाजारात येईल आणि त्यावेळी कांद्याची आवक आणखी वाढणार आहे.

अशा परिस्थितीत भविष्यात कांद्याची आवक वाढल्यानंतर बाजार भाव आणखी कमी होणार की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर कसे राहणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर कांद्याचा बाजार नेमका कोणत्या दिशेने झुकणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe