स्पेशल

विरोधकांची बोलती बंद ! महाराष्ट्रातील सर्व बहिणींच्या खात्यावर पैसे वर्ग, सुजय विखे म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, स्व कर्तृत्वावर उभे करणे व सर्व बहिणींच्या आर्थिक उत्कर्षाकरिता महायुती सरकारने सदरील योजना आणल्याचे मत विखे यांनी मांडले.

अहिल्यानगर येथील सहकार भवन येथे माझा भाऊ देवेंद्र भाऊ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. विरोधकांनी योजना सुरू केल्यानंतर टीका केली की सरकारकडे इतके पैसे आहेत का? सरकार इतक्या महिलांना पैसे देऊ शकते का  ? पंधराशे रुपये मध्ये काय होणार? असे अनेक प्रश्न निर्माण करून विरोधक हे समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पैशांचे मोल काबाड कष्ट करून उपजीविका करणाऱ्या महिलांना जाऊन विचारा, म्हणजे त्यांना याचे उत्तर मिळेल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना धारेवर धरले.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व बहिणींच्या खात्यावर पैसे वर्ग होत आहेत, यावरूनच खरंतर विरोधकांची बोलती बंद झाली आहे. महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आणि महिना अखेर महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग केलेत हे मोठे यश महायुती सरकारचे आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले.

महिला सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच तब्बल दहा ते पंधरा कोटी कर्ज बचत गटांना देण्यात आले. ते कर्ज आता रोजगाराच्या माध्यमातून बँकेला परत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच डीपीडीसीच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून महिलांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.

‘खासदार म्हणून कार्यरत असताना नगर जिल्ह्यातील विविध रस्ते सुधारले, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले यासह विविध मोठमोठे प्रश्न मार्गी लावले आहेत. शिवाय लोकसभेला पराभव होऊन सुद्धा मी दुसऱ्याच दिवसापासून कामाला लागलो आणि ही वाटचाल निरंतर सुरूच राहील. विशेष म्हणजे सुशिक्षित प्रतिनिधी नसल्याने काय होते ते येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच असेही विधान सुजय विखे यांनी बोलताना केले.

तसेच त्यांनी स्पष्ट केले की, विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला आणि आरोपांना बळी पडू नका. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

प्रत्येक लाडक्या बहिणीस प्रती महिना पंधराशे रुपये देण्यात येत आहेत. यासह राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना देखील सुरू केल्या असून बस भाडे मध्ये पन्नास टक्के सवलत, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण, तिर्थदर्शन योजना आणि बचत गटाच्या माध्यमातून अनुदान देण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे हे सरकार जनतेच्या मनातील सरकार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच या पुढील काळातही महायुती सरकारची सत्ता आली तर लाडक्या बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केले असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24