Categories: स्पेशल

अन्यथा भविष्यात जलसंकटाला तोंड देण्याची वेळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाणी ही एक संपत्ती आहे. सध्या पाऊस चांगला झाला असून, ओला दुष्काळाची ओरड करणार्‍यांनी निसर्गाने दिलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा हे पाणी वाया घालवून भविष्याच्या दृष्टीने पाणी बचतीचा विचार न केल्यास काळ माफ करणार नाही. ज्या देशात पाण्याची कमतरता आहे.

त्या देशांनी पाण्याचे योग्य नियोजन केलेले आहे. तर आपल्या देशाला निसर्गाने भरभरुन दिले असून, देखील वारेमाफ पध्दतीने पाण्याचा अपव्यय सुरु आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन होण्याची गरज असून, अन्यथा भविष्यात पाण्याच्या मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ येणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही.

घरात 24 तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणार्‍या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

चार वर्षापुर्वी महाराष्ट्रात सतत दुष्काळी परिस्थिती राहिली आहे. या दुष्काळाचा गंभीर फटका शेतकर्‍यांना बसला. यावर्षी चांगले पाऊस झाले असून, सर्व पाण्याचे स्त्रोत भरले आहेत. तर वाया जाणार्‍या पावसाच्या पाण्याचे देखील नियोजन करणे गरजेचे आहे. भूगर्भातून पाण्याचा उपसा एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की, या स्पर्धेतून आपल्या पुढच्या पिढीसाठी नेमके आपण काय ठेवतोय हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पाणी हे अमूल्य रत्न व दागिने हून अधिक किमती आहे. याचा विसर मनुष्याला पडला आहे. पाणी हे सजीवांचे प्राण होय. आजच्या विज्ञान युगात पाण्याच्या संकटाने विकराल रूप धारण केले आहे. तरीही जलसंकट जागतिक स्वरूप धारण करीत आहे. राष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून पाण्याकडे पाहिले जाते. एकंदरीत सगळ्या सजीवसृष्टीसाठी पाणी आवश्यक आहे. पण पाण्याचे नियोजन नसल्याने हा प्रश्‍न अधिक गंभीर बनत चालला आहे.

भविष्यात पाण्यासाठी जगापुढे मोठे संकट उभे राहणार आहे. यासाठी पाण्याचा अतिशय कटाक्षाने व नियोजन पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. केवळ पाण्याची बचत करा असे ऐकून किंवा बोलून चालणार नाही तर ते प्रत्यक्षात कृतीत उतरावे लागणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे. पावसाळ्यात पावसाचे पाणी इमारतीच्या गच्चीवर व आवारात पडून ते रस्त्यावर वाहून तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये साठवून ठेवणे.

तर अशा रीतीने साठवलेल्या पाण्याचा उन्हाळ्यात किंवा पाणीटंचाईच्या काळात उपयोग करता येऊ शकतो. राज्यात खालवत चाललेली भूजल पातळी ही गंभीर समस्या असून, पूर्वी शंभर ते दीडशे फुटांवर मिळणारे पाणी चारशे ते पाचशे फुटापर्यंत खोल गेले आहे. यामुळे पाण्याची भूजल पातळी वाढवणे गरजेचे आहे. कोणाचा रस्ता वाढवण्यापेक्षा पाणी आडवा, कोणाची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा हाच संदेश प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.

भविष्यातील पाणी प्रश्‍न ओळखून पोपट पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरेबाजार तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्धी या गावांनी देशा समोर रोल मॉडेल उभे केले. या दोन्ही गावांनी संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा देऊन पाणी बचतीचा संदेश दिला. प्रत्येक गावाने पाण्याचा ताळेबंद करणे आवश्यक आहे. संसार करताना आपण हिशोबाचे नियोजन करतोच ना तसाच पाण्याचा ताळेबंद होणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात पाणी किती उपलब्ध होते त्यावर कोणती पीके घेतली पाहिजे? उसासारख्या पिकांना पाणी जास्त लागते. परंतु उसाला पाणी देताना ते ठिबक किंवा इतर पद्धतीने दिल्यास पाण्याची बचत होणार आहे. तर उसाऐवजी कमी पाण्याची पिके घेतली तर पाण्याची एक प्रकारे बचत होणार असून, याचा विचार देखील करणे गरजेचे आहे. दैनंदिन वापरात देखील पाण्याचा काटकसरीने वापर करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी व कर्तव्य आहे.

दिवसभरात महिला मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत असतात त्यांना पाणी बचतीचे प्रशिक्षण दिल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. बर्‍याचदा कुठेतरी जवळपास नळ सुरू असल्याचा आवाज ऐकू येतो. पाण्याचा आवाज ऐका. कुठे पाणी वाहते आहे याचा शोध घेऊन नळ बंद करा. विनाकारण कोणी पाणी वाया घालवत असेल, तर त्याला समज द्या. जनजागृती करा. कुंडीमध्ये पाण्याचा ओलावा ठेवू शकता आणि सेंद्रीय कोरड्या तणाचा वापर करा.

हे तण ओले करून त्याचे आच्छादन दिल्याने कुंडीतील झाडास पाणी कमी लागते. आठवड्यातून काही ठराविक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा. फिशटँकमधील पाणी कुंड्यांना घाला. पृथ्वीवर सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला तरी पिण्यासाठी लागणारे पाणी अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पृथ्वीवरील फक्त 2 टक्के शुद्ध पाणी मानवाला सेवन करण्यासाठी उपयुक्त आहे. भूजल हा शुद्ध पाण्याचा स्त्रोत आहे.

त्याचे मुख्य कारण म्हणजे तिथे पाण्याचे शुद्धीकरण करण्याची नैसर्गिक प्रक्रिया उपलब्ध असते. ही सगळी पार्श्‍वभूमी लक्षात घेता शक्य तेवढे पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तर जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 30 टक्के वनांचे प्रमाण आवश्यक आहे. मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने एकूण जमिनीचे 21 टक्के पेक्षा कमी वने शिल्लक आहे. वने कमी झाल्याने पावसाचे पाणी अडविले जात नाही. ते जलदगतीने वाहुन जाते.

पर्यायाने भूजल पुनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया खंडित झाली आहे. यामुळे जलसाठे कमी होताना दिसत आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी वृक्षांची लागवड व संवर्धन हा एक देखील प्रभावी माध्यम आहे. नद्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाटा उचलू शकतो. भौतिक प्रगती साधताना मानव आणि निसर्ग संपत्तीची अक्षरशः लूट चालवली आहे बेसुमार वृक्षतोड पाण्याचा अतिवापर यामुळे भूगर्भातील जलस्त्रोत आटत आहे.

मोठ्या शहरात पाण्याचे संकट असून, शहरांमधून निघणारे सांडपाणी इतर वापरासाठी येऊ शकते. याला रिसायकल वॉटर ही संकल्पना महत्त्वाची आहे. शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात पाणी बचतीचे धडे देऊन त्यासाठी जागृत करण्यात आली. मात्र याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. जल हे तो कल है. निसर्गाने मनुष्याला भरभरून दिले मात्र मनुष्याची ओरबडून घेण्याची सवय अजूनही संपलेली नाही.

या सवयीमुळे तो त्याच्या विनाशाला स्वतः कारणीभूत ठरणार आहे. भविष्यातील शाश्‍वत विकास हा पाण्यावर अवलंबून असणार आहे. आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याची आयात-निर्यात होण्याची शक्यता असून, मनुष्याने पाण्याचे महत्त्व ओळखून त्याची बचत व नियोजन करणे आवश्यक आहे.

  • -पै. नाना डोंगरे
  • निमगाव वाघा, ता.जि. अहमदनगर
  • 9226735346

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24