स्पेशल

पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा ! महाराष्ट्रात अवकाळीला सुरुवात ; आणखी ‘इतके’ दिवस ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस

Published by
Ajay Patil

Panjabrao Dakh News : राज्यात कालपर्यंत थंडीचा जोर वाढत होता. अनेक भागात थंडीची लाट आली होती. मात्र आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले पंजाबराव डख यांनी 3 जानेवारी दरम्यान आपला सुधारित हवामान अंदाज वर्तवला.

यामध्ये त्यांनी 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता आणि काही भागात पाऊस कोसळेल अशी भविष्यवाणी केली होती. यामध्ये त्यांनी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे सांगितले होते.

तसेच अमरावती व आजूबाजूच्या जिल्ह्यात पाऊस कोसळेल असे देखील त्यांनी वर्तवले. झालं देखील तसंच काहीसं. पंजाबराव यांनी वर्तवलेला हवामान अंदाज अतिशय तंतोतंत खरा ठरला आहे. त्यांनी वर्तवल्याप्रमाणे अमरावती, बुलढाणा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काल मध्यरात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदूर, शेगाव या तीन तालुक्यात पाऊस कोसळला. अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यात पावसाची हजेरी राहिली. तर भंडारा आणि गोंदिया मध्ये देखील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरं पाहता, ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे सध्या वावरात उभे असलेलं तूर पीक आणि तरकारी म्हणजेच भाजीपाला वर्गीय पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच याचा रब्बी हंगामातील पिकांना देखील फटका बसणार आहे. निश्चितच पंजाबरावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

सध्या महाराष्ट्रात ढगाळ हवामान कायम असून आज आणि उद्यापर्यंत राज्यात असच हवामान राहणार आहे. तसेच अमरावती आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी वावरात उभे असलेले पीक वाचवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे अनिवार्य आहे. तसेच पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची देखील योग्य ठिकाणी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

एकंदरीत शेतकरी बांधवामध्ये पुन्हा एकदा पंजाबरावांच्या अंदाजावरील विश्वास वाढला आहे. तसे पाहता, पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकरी हातोहात घेत असतात. शेतकऱ्यांचा त्यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. मात्र असे असले तरी हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विश्वासात ते खरे उतरत नाहीत.

यामुळे त्यांनी यावेळी पंजाबरावांच्या अंदाजावर चांगलेच ताशेरे ओढले होते. विशेष म्हणजे हे काय पहिल्यांदाच झालं असं नाही याआधी देखील पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर हवामान विभागातील तज्ञ लोकांनी कायमच आक्षेप नोंदवला आहे.

मात्र 3 जानेवारी रोजी वर्तवलेला पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज 4 जानेवारी रोजी सत्यात उतरला असल्याने ज्या लोकांनी या हवामान अंदाजावर संशय व्यक्त केला होता अशा लोकांसाठी आरसा दाखवण्याचे काम याप्रसंगी झाले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil