Panjabrao Dakh On Soybean Farming : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शेती केली जाते. एका आकडेवारीनुसार, देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रात 40 टक्के सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत आपल्या राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
प्रथम क्रमांक हा मध्य प्रदेश राज्याचा असून त्या ठिकाणी देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते. साहजिकच, राज्यातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र हे उल्लेखनीय असून बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे.
मात्र असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बसत असतो. अनेकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र जर शेतकरी बांधवांनी योग्य वाणाची पेरणी केली तर अतिवृष्टीमध्ये देखील कमी नुकसान शेतकऱ्यांच होत. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय पंजाबराव डख यांनी सोयाबीन उत्पादकांना एक मोठा मोलाचा सल्ला दिला आहे.
पंजाबरावांनी सोयाबीनच्या अशा काही जाती सांगितल्या आहेत ज्या अतिवृष्टी झाली तरी देखील तग धरून राहतात आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संसोधीत M.A.U.S.612 ही सोयाबीनची अशी जात आहे जी सलग पंधरा दिवस पाऊस कोसळला तरी देखील तग धरून राहते आणि यापासून अधिक उत्पादन मिळतं.
याशिवाय डख यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेल्या फुले किमया आणि फुले संगम या दोन जातींची पेरणी करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. राहुरी विद्यापीठाने विकसित केलेल्या या दोन्ही जाती 19 क्विंटल प्रति एकर उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव पंजाब रावांनी सांगितलेल्या या जातींची पेरणी करून अधिक उत्पादन मिळवू शकणार आहेत. मात्र असे असले तरी सोयाबीनच्या कोणत्याही जातीची पेरणी करण्या अगोदर शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांचा एकदा सल्ला घेतला पाहिजे आणि आपल्या जमिनीच्या पोत प्रमाणे आणि हवामानाप्रमाणे सोयाबीनच्या योग्य जातीची निवड केली पाहिजे जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन सोयाबीन पिकातून मिळू शकेल.