Petrol Diesel Rate : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरम्यान, या सणासुदीच्या आधीच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लवकरच इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नोकरदार वर्गाला बसत आहे.
शेतकरी, शेतमजूर हे घटकही पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे प्रभावित झालेले आहेत. मात्र इंधन दरवाढीमुळे त्रस्त असणाऱ्या या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच केंद्रातील मोदी सरकारकडून मोठी भेट मिळणार आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार अशी खात्रीलायक बातमी समोर येत आहे.
पेट्रोल डिझेलच्या किमती जवळपास दोन ते तीन रुपयांनी कमी होतील असा अंदाज आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्या पाहिजेत अशी मागणी देशातील नागरिकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केली जात आहे. मात्र या संदर्भात सरकारने अजूनही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही.
लोकसभा निवडणुकीच्या आधी अर्थातच मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या होत्या. तेव्हापासून मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाहीत. कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत आणि पेट्रोल डिझेलचे विक्रीचे दर अजूनही तेजितच आहेत यामुळे तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे.
यामुळे तेल कंपन्यांकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दोन ते तीन रुपयांची कपात करण्यास वाव आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 74 रुपये प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. या किमती मार्चमध्ये 83 – 84 डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या.
जर कच्च्या तेलाच्या किमती कमी राहिल्या तर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांनी कमी करू शकतात. साहजिकच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यात तर याचा मोठा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. खरंतर, येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरु होणार आहेत.
महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही तसेच होऊ नये यासाठी राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्रातील सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्रातील सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
हा निर्णय विधानसभेच्या निवडणुकांच्या आधीच होण्याचे शक्यता आहे. 15 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दोन रुपयांनी कमी झाल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दोन ते तीन रुपयांनी कमी होतील अशी शक्यता आहे.
5 ऑक्टोबर नंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो असे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे. तथापि यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळे केंद्रातील सरकार खरंच पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.