Pm Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेअंतर्गत 17 मे 2023 पासून नव्याने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत.
अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर आणि इतर सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध होत आहेत. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून केवळ पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा शेतकऱ्यांना भरून सौर कृषी पंप मिळणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीकडून निधी पुरवला जातो. यामध्ये केंद्र शासनाकडून 30 टक्के आणि राज्य शासनाकडून 60 ते 65 टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो.
दरम्यान, आज आपण या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कुठे अर्ज करावा लागेल तसेच यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा
पीएम कुसुम योजना आहे तरी काय?
ही योजना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन उपलब्ध व्हावे म्हणून सौर कृषी पंप शासनाकडून पुरवले जात आहेत. राज्यात ही योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाच्या माध्यमातून राबवले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप पारंपारिक पद्धतीने विज जोडणीचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना सौर कृषी पंप पुरवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे आहे.
पीएम कुसुम योजना अंतर्गत मिळणारे अनुदान
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळतात. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर आणि इतर शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर कृषी पंप मिळतात. तीन एचपी पासून ते 7.5 एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वितरित केले जातात. यासाठी शेतकऱ्यांना पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
यंदा कोटा वाढला आहे
मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्रत्येक जिल्ह्यात या योजनेसाठी कोटा वाढवण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी या आर्थिक वर्षात 3728 सौर कृषी पंप शेतकऱ्यांसाठी आस्थापित करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.
हे पण वाचा :- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….
ऑनलाइन अर्ज कुठे करणार?
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/ register/Kusum-Yojana-Component-B या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज सादर करता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी इतर कोठेही अर्ज करू नये असे आवाहन मात्र महाऊर्जेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कोण-कोणती कागदपत्रे लागणार?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, शिधापत्रिका, नोंदणीची प्रत, जमीन कराराची प्रत, शेतात ओलित साधनांची नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक व जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.