Poisonous Snake In India:- मानवाच्या मनामध्ये सापांविषयी प्रचंड प्रमाणात भीती असते. मग तो विषारी असो की बिनविषारी.साप नुसता आपल्या समोर जरी आला तरी आपला थरकाप उडतो. कारण आपल्याला प्रत्येकाला असे वाटत असते की साप जर व्यक्तीला चावला तर माणूस मरतो असा एक समज आहे.
परंतु प्रत्यक्षात जर पाहिले तर सापांच्या एकूण हजारो प्रजाती आहेत.परंतु त्यातील काही मोजक्याच प्रजाती या विषारी वर्गात येतात. फक्त आपल्याकडून त्यांना ओळखता येणे खूप गरजेचे आहे. आता भारताचा विचार केला तर भारतामध्ये एकूण सापांच्या प्रजाती पैकी फक्त सात प्रजाती या सर्वात विषारी आहेत व बहुसंख्य या बिनविषारी आहेत.
परंतु असे म्हटले जाते की साप चावल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू जितक्या सापाच्या विषाने होत नाही तेवढे नुसते भीतीने होतो. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये भारतात ज्या काही विषारी सापांच्या जाती आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत व त्यांची इतर वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत.
भारतातील सापाच्या विषारी जाती
1- किंग कोब्रा– भारतात आढळणारी ही सापाची जात भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात लांब विषारी सापाची जात म्हणून ओळखली जाते. किंग कोब्रा जातीच्या सापाची लांबी पाच मीटर म्हणजे 13 फुटापर्यंत असू शकते. भारतातील तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ही जात प्रामुख्याने दिसून येते.
भारतामध्ये साप चावल्याने जे काही एकूण मृत्यू होतात त्यामध्ये सर्वाधिक मृत्यू किंग कोब्रामुळे होतात. किंग कोब्रा जातीच्या सापाचे विष हे कार्डिओटॉक्सिक आणि न्यूटॉक्सिक आहे. हा साप चावल्या बरोबर मज्जा संस्था काम करणे थांबवते व शरीराला अर्धांगवायू होतो. एवढेच नाही तर किंग कोब्राच्या विषामुळे माणसाला आंधळेपण देखील येऊ शकते.
2- स्पेकटेकल्ड कोब्रा अथवा नाग– हा भारतामध्ये आढळणारा सर्वात सामान्य साप असून यालाच आपण नाग या नावाने देखील प्रामुख्याने ओळखतो. त्या सापाच्या तोंडावर चष्म्यासारखी खूण असते म्हणून त्याला स्पेक्टकल्ड कोब्रा असे देखील म्हणतात. या सापाचे विष न्यूरोटॉक्सिक असते. म्हणजेच हा साप जर चावला तर डोळ्यांमध्ये अंधारी येते व श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. तसेच झोप देखील यायला लागते.
3- रसेल वाइपर– या जातीचा साप जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये आढळतो. हा थोडा रागीट व रागावणारा साप आहे. जेव्हा हा फुतकारतो तेव्हा कुकरच्या शिट्टी सारखा आवाज येतो. या सापाच्या अंगावर काळ्या तपकिरी आणि चॉकलेटी रंगाच्या अंगठी सारखे कडे असतात. बरेच लोक त्याला अजगर म्हणून समजतात व पकडण्याचा प्रयत्न करतात व आपला जीव गमावून बसतात. हा एक विषारी साप असून त्याचे विष हेमोटॉक्सिक प्रकाराचे आहे. ज्यामुळे हा साप चावल्याने रक्त घट्ट होते व शरीरातील उती मरायला लागतात.
4- कॉमन क्रेट– हा भारतातील सर्वात लाजाळू साप म्हणून ओळखला जातो. परंतु हा प्रचंड प्रमाणात विषारी साप आहे. या सापाच्या बारा प्रजाती असून सर्व प्रजाती रात्री बाहेर येतात आणि कधी कधी उष्णता मिळवण्याकरिता अंथरुणामध्ये प्रवेश करतात. या जातीच्या सापाचे दात अतिशय लहान असतात व त्यामुळे त्याने चावा जरी घेतला तरी आपल्याला कळत नाही व झोपेमध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे कॉमन क्रेट जातीच्या सापाला सायलेंट किलर असे देखील म्हटले जाते. या जातीच्या सापाचे विष न्यूरोटॉक्सिक असते व ते थेट व्यक्तीच्या मज्जासंस्थेचे नुकसान करते.
5- सॉ–स्केल्ड वायपर– या जातीच्या सापाचा आकार हा रसेल वायपर जातीच्या सापाच्या आकारापेक्षा कमी असतो. या जातीच्या सापाची लांबी जरी कमी असली तरी चपळता आणि वेगाच्या बाबतीत तो खूप प्रगत आहे. ग्रामीण भागामध्ये या जातीचा साप चावण्याच्या घटना जास्त घडून येतात. या सापाचे विष देखील हेमोटॉक्सिक असते. या जातीच्या सापाच्या शरीरावर लाकडाप्रमाणे तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात.
6- बांबू पीट वायपर– हा देखील भारतातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे. या जातीचा साप दक्षिण भारतातील पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागामध्ये आढळून येतो. बांबू पीट वायपर जातीचा साप गवताळ प्रदेशात, जंगलांमध्ये आणि बांबूंमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. या सापामध्ये उष्णता संवेदनाक्षम यंत्रणा असते. याच्या माध्यमातून त्याला आजूबाजूच्या उष्णतेची जाणीव होत असते. या जातीच्या सापाची लांबी अडीच ते तीन फूट असते. या सापाचे विष न्युरोटॉक्सिक असते. परंतु या सापाच्या चाव्याची प्रकरणे फार कमीत कमी दिसून येतात.