स्पेशल

युवा शेतकरी पवार यांचे डाळिंब पोहचले मलेशिया व श्रीलंकेत! मिळाला आजवरचा सर्वोच्च दर, लाखोत होईल कमाई

Published by
Ajay Patil

सध्या महाराष्ट्रातील शेतकरी व त्यातल्या त्यात तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळभागाच्या लागवडीकडे वळल्याचे चित्र असून तंत्रज्ञानाचा वापर व योग्य व्यवस्थापनामुळे दर्जेदार आणि निर्यातयोग्य फळांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर भर देताना आपल्याला दिसून येत आहेत.

अनेक विपरीत परिस्थितीशी तोंड देत योग्य व्यवस्थापन ठेवून विविध प्रकारच्या फळांचे भरघोस उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी यशस्वी झाल्याचे आपण बघतो. अगदी याच पद्धतीने जर आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण तसेच सटाणा, मालेगाव आणि देवळा या चार तालुक्यांचा परिसर पाहिला तर तसा हा परिसर प्रामुख्याने कांदा आणि मका व फळबागांमध्ये डाळिंब पिकांसाठी ओळखला जातो.

फळबागांमध्ये डाळिंबाची लागवड या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये डाळिंब पिकावर मर आणि तेल्या  यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढून टाकलेल्या होत्या.

परंतु पुन्हा एकदा या पट्ट्यातील शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले असून विविध अडचणींवर मात करत डाळिंबाच्या बागा परत एकदा यशस्वी करत आहेत.

अगदी याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या सातमाने या गावचे तरुण शेतकरी निलेश पवार यांनी डाळिंबाचे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेतले असून ते डाळिंब थेट मलेशिया व श्रीलंकेत पोहोचवले आहे.

 निलेश पवार यांचे डाळिंब पोहचले मलेशिया श्रीलंकेत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागच्या वर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती व विविध रोगांचा प्रादुर्भाव असताना देखील परिस्थितीवर मात करत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या सातमाने या गावचे तरुण शेतकरी निलेश पवार यांनी डाळिंब लागवड करून योग्य व्यवस्थापन ठेवले व निर्यातक्षम डाळींब उत्पादित केले.

विशेष म्हणजे त्यांच्या डाळिंबाला आजवरचा सर्वोच्च दर मिळाला व तो दर 211 रुपये प्रतिकिलो इतका आहे. त्यांनी डाळिंबाचे एवढे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे की हे इतर शेतकरी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेत आहेत व डाळिंबावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी किंवा नियंत्रणाकरिता काय केले याची माहिती देखील घेत आहेत.

असे पाहिला गेले तर मालेगाव तालुक्यातील सतमाने व आजूबाजूचा परिसर हा डाळिंब पिकासाठी ओळखला जातो. निलेश पवार व त्यांचे कुटुंब गेले कित्येक वर्षापासून निर्यातक्षम डाळिंब उत्पादनामध्ये अग्रेसर असून निलेश पवार यांनी पिकवलेली डाळिंब या आधी देखील अनेक देशांमध्ये निर्यात करण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सातमाने गाव दत्तक घेतलेले आहे. दादा भुसे यांच्या माध्यमातून निलेश पवार यांच्या शेतात उत्पादित झालेले डाळिंब 29 ऑगस्ट 2023 ला मंत्रालयामध्ये नेण्यात आलेले होते

व त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार इत्यादी नेत्यांनी देखील निलेश पवार यांच्या डाळिंबाची चव चाखलेली होती व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निलेश पवार यांचे कौतुक देखील करण्यात आले होते.

 कसे केले आंबिया बहाराचे नियोजन?

निलेश पवार यांनी प्रमुख्याने डाळिंबाच्या आंबिया बहाराचे नियोजन केलेले होते व याकरता एक फेब्रुवारीला बागेची पानगळ केली व डाळिंबाला शेणखताचा पुरवठा केला.

त्यासोबत योग्य प्रमाणात दुय्यम अन्नद्रव्य व प्रत्येक महिन्याला बॅक्टेरिया स्लरी डाळिंबाच्या बागेला दिली. विशेष म्हणजे निलेश पवार यांनी संपूर्णपणे सेंद्रिय शेती करण्यावर भर दिलेला आहे.

तेल्या रोगावर मात करत त्यांनी डाळिंब बागेची योग्य काळजी घेतली व सात महिन्यामध्ये डाळिंबाची पीक मिळवण्यात यश मिळवलेले आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या या शेतामध्ये दररोज 100 पेक्षा अधिक मजुरांना रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे. डाळिंबाला दोनशे रुपये पेक्षा जास्त भाव मिळणारे निलेश पवार हे महाराष्ट्रातील पहिले तरुण डाळिंब उत्पादक ठरले आहेत.

Ajay Patil