Post Office Scheme : आपण सर्वजण पैसे कमवण्यासाठी दिवस-रात्र काबाडकष्ट करतो. नोकरी, उद्योग, शेती अन मजुरी करून पैसे कमवतो. दरम्यान आपण कमावलेले पैसे कुठेतरी सुरक्षित ठिकाणी गुंतवून पैशाचे मूल्य वाढवावे यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. पैशांच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
पण आजही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. आपल्याकडील पैसा आणखी वाढला पाहिजे आणि केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असायला हवी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका सुरक्षित बचत योजनेची माहिती पाहणार आहोत.
म्हणून जर तुम्हाला ही पोस्ट ऑफिसच्या सुरक्षित बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये एवढा परतावा मिळणार आहे.
कोणती आहे ती योजना
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम. ही स्मॉल सेविंग स्कीम सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असून चांगले आकर्षक व्याजदर देणारी ही योजना अलीकडे मोठ्या प्रमाणात चर्चेस आली आहे.
या योजनेत गुंतवणूकदार सिंगल अकाउंट आणि जॉइंट अकाउंट ओपन करू शकतात. सिंगल अकाउंट मध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात.
यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 7.4% व्याजदराने परतावा दिला जात आहे. किमान दहा वर्षे वय असणाऱ्या बालकांच्या नावाने पालकांना यामध्ये गुंतवणूक करता येते. पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने या योजनेत अकाउंट ओपन करू शकतात.
या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते आणि नंतर एक हजाराच्या पटीने गुंतवणुकीची रक्कम वाढवता येते. सिंगल अकाउंट ओपन केल्यास कमाल नऊ लाख आणि जॉईंट अकाउंट ओपन केल्यास कमाल 15 लाख रुपये गुंतवता येतात आणि जॉईंट अकाउंट मध्ये प्रत्येक अकाउंट होल्डर चा समान वाटा असतो.
या अल्पबचत योजनेवर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज मिळत आहे. जमा केलेल्या पैशांवर जे काही वार्षिक व्याज दिले जाते ते १२ भागांमध्ये विभागले जाते आणि ते दर महिन्याला गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा होते.
जर गुंतवणूकदाराने या योजनेतून मिळालेले व्याजाचे मासिक पैसे काढले नाहीत तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहतील आणि हे पैसे मुद्दलात जोडून तुम्हाला पुढील व्याज मिळणार आहे. याच नियमांमुळे या योजनेत केलेली गुंतवणूक ग्राहकांसाठी फायद्याचे ठरते. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, परंतु 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवीन व्याजदरानुसार ती मुदत आणखी वाढवली जाऊ शकते.
कसे मिळणार 9250 रुपये?
जर समजा एखाद्या व्यक्तीने सिंगल अकाउंट ओपन करून यामध्ये कमाल नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर अशा व्यक्तीला 7.4% व्याजदराने वार्षिक 66 हजार 600 रुपये व्याज मिळणार आहे म्हणजेच महिन्याला पाच हजार 550 रुपये व्याज मिळेल. जर समजा जॉईंट अकाउंट ओपन करून एखाद्याने यात 15 लाखाची गुंतवणूक केली तर अशा प्रकरणांमध्ये 7.4% व्याजदराने वार्षिक एक लाख 11 हजार रुपये व्याज मिळणार आहे म्हणजेच महिन्याला 9250 व्याज मिळेल.