Poultry Farming:- शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर शेळीपालन, पशुपालन आणि कुक्कुटपालन हे तीन व्यवसाय प्रामुख्याने केले जातात. या तिन्ही व्यवसायांमध्ये आता तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या स्वरूपामध्ये देखील आता हे व्यवसाय अनेक शेतकरी करू लागले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे कुक्कुटपालन व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितले तर आता हा व्यवसाय परसातील कुक्कुटपालन या संकल्पनेपुरता मर्यादित राहिला नसून तो आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या स्वरूपात केला जात असून यामध्ये गावरान कोंबड्यांचे पालन देखील खूप मोठे स्वरूपामध्ये शेतकरी करत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण पुणे शहराच्या जवळ असलेल्या सोलापूर महामार्गावर मांजरी या गावातील संदीप खवले या शेतकऱ्याने मुक्त संचार पद्धतीने गावरान कोंबड्यांचा फार्म उभारला व त्यातूनच लाखो रुपयांच्या नफा मिळवण्याची किमया साधली आहे.
गावरान कोंबडी पालनातून मिळवली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे शहरालगत सोलापूर महामार्गावर मांजरी हे गाव असून पुण्याच्या जवळ असल्यामुळे गावाचा विकास देखील मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या सगळ्या विकसित भागांमध्ये संदीप खवले या शेतकऱ्याची महामार्ग लगत शेतजमीन असून या शेतीमध्येच संदीप हे गावरान कुकुट पालनाचा व्यवसाय करतात.
आपल्याला माहित आहे की कुठेही आज गावरान चिकनची आणि गावरान अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. गावरान कोंबड्यांची निवाराच्या सोयीसाठी त्यांनी चार शेड उभारले असून झोपडी वजा पारंपारिक पद्धतीने पाच शेड देखील तयार केलेल्या असून त्यांना लोखंडी जाळ्यांचे कंपाऊंड मारलेले आहे. कंपाऊंडच्या आत मध्ये नैसर्गिक पद्धतीने मुक्त संचार पद्धत वापरून गावरान कोंबड्यांचे पालन सुरू केलेले आहे.
व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अशी सोय केली आहे की कोंबड्यांच्या निवारासाठी आणि कोंबड्यांना मोकळेपणाने फिरता यावे याकरता वेगवेगळ्या जागा शेड उभारताना आधी सोडलेले आहेत. या सगळ्या नियोजनामुळे कोंबड्यांची शारीरिक वाढ उत्तम पद्धतीने होते व त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहते. शेडमध्ये वारंवार कीडनाशकांची फवारणी व शेडची स्वच्छता करण्यावर भर दिला जातो.
अशाप्रकारे केले आहे कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन
इतर कोंबड्यांच्या जातीच्या तुलनेत गावरान कोंबड्यांवर खाद्याचा खर्च हा खूप कमी येतो. आपल्याला माहित आहे की जमिनीवरची किडे व मुंग्या खाऊन देखील या कोंबड्या गुजराण करू शकतात. खवले यांच्या फार्मवर कोंबड्यांना शेवग्याचा पाला तसेच बागेतील व इतर महत्त्वाचा झाडपाला, हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ इत्यादी कोंबड्यांना खायला दिले जातात.
अशाप्रकारे आहे खवले यांची कोंबड्यांची विक्री व्यवस्था
खवले यांच्या गावरान कोंबडी फार्मवर ग्राहक थेट येतात व त्यांना जी कोंबडी आवडेल ती कोंबडी निवडून तिची खरेदी करतात. दुसरा पर्याय म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून देखील चिकनच्या ऑर्डर ते घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने ते व्हाट्सअप आणि कॉलचा प्रामुख्याने वापर करतात. जर एखादे ग्राहक दूर अंतरावर राहत असले तर त्यांना घरपोच डिलिव्हरी केली जाते व डिलिव्हरी साठी शुल्क आकारतात.
किती मिळवतात उत्पन्न?
या त्यांच्या गावरान पोल्ट्री फार्म मध्ये नैसर्गिक पद्धतीने कोंबड्यांची वाढ केली जाते व या ठिकाणी गावरान चिकन 800 ते 900 रुपये किलो प्रमाणे ते विक्री करतात. त्याचप्रमाणे अंड्यांची विक्री 15 रुपये नग याप्रमाणे केली जाते व महिन्याकाठी ते 800 ते 900 जिवंत कोंबड्यांची विक्री करतात व पंधरा हजार गावरान अंड्याची विक्री ते करतात. या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना प्रतिमहिना मिळते.