Property Rights : भारतात मुलींना आणि मुलांना समान अधिकार देण्यात आले आहेत. संपत्तीत देखील मुला मुलींना समान अधिकार मिळतो. लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणेच समान अधिकार देण्यात आले आहेत.
पण काही प्रकरणांमध्ये मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाहीत. दरम्यान आज आपण कोणत्या परिस्थितीत मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही त्या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो सन 1956 मध्ये भारत सरकारने हिंदू उत्तर अधिकारी कायदा अस्तित्वात आणला. या कायद्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मातील लोकांमधील संपत्तीचे वाटप आणि वारसा हक्काबाबत तरतूद करण्यात आली.
मात्र या कायद्यामध्ये मुलींना कोणताच अधिकार देण्यात आला नव्हता. यामुळे पुढे या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारने २००५ मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा मध्ये सुधारणा केली.
यानुसार, वडिलांच्या मालमत्तेत मुलींना मुलांइतकाच अधिकार देण्यात आला. दरम्यान आता आपण विवाहित मुलींच्या बाबतीत हा कायदा काय सांगतो ? वडिलांच्या मालमत्तेवर विवाहित मुलींचाही हक्क आहे का ? तसेच, विवाहित मुलींना कोणत्या परिस्थितीत आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही याचा आढावा घेणार आहोत.
काय सांगतो कायदा?
हिंदू उत्तर अधिकारी कायदा 2005 नुसार अविवाहित मुलींप्रमाणेच विवाहित मुलींना देखील आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो. पण काही प्रकरणांमध्ये मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, जर वडिलांनी हयात असताना इच्छापत्र अर्थातच मृत्युपत्र तयार केले असेल अन त्यामध्ये संपूर्ण मालमत्ता मुलाच्या नावावर हस्तांतरित केली असेल तर मुलगी अशा मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही.
पण इच्छापत्र तयार केलेले नसेल तर ती मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकते. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलीला हक्क असतो, परंतु, जर वडिलांनी स्वतःच्या कष्टाने संपत्ती तयार केलेली असेल म्हणजेच स्व अर्जित मालमत्ता असेल तर अशा संपत्तीवर मुलींना दावा करता येत नाही.
वडिलांना हवे असल्यास ती संपत्ती ते मुलींना देऊ शकतात किंवा मग ते इतर कुणालाही ती संपत्ती देऊ शकतात. जर वडिलांनी अशी संपत्ती मुलींना न देण्याचा निर्णय घेतला तर मुलींना या संपत्तीवर दावा करता येत नाही.
यासोबतच जर वडिलांच्या मालमत्तेवर फौजदारी गुन्हा दाखल असेल तर मुलगी किंवा कुटुंबातील अन्य कोणतेही सदस्य त्यावर ताबा मिळवू शकत नाही. एवढेच नाही तर १९५६ मध्ये हिंदू वारसा कायदा लागू होण्यापूर्वी जर एखाद्या मुलीच्या वडिलांचे निधन झाले असेल तर अशा प्रकरणांमध्ये वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा हक्क नसतो.