Property Transfer Rule:- आजकाल आपण पाहतो की, पती-पत्नी दोघेही कमावते असतात व अशावेळी ते काही मालमत्ता दोघं मिळून खरेदी करतात. फक्त मालमत्ता फ्लॅट असो किंवा प्लॉट किंवा जमीन अशा कोणत्याही स्वरूपाची असू शकते. परंतु काही कारणास्तव जर कालांतराने या दोघांच्या नात्यांमध्ये जर वितुष्ट निर्माण झाले आणि त्यांनी जर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर अशावेळी मात्र मालमत्तेच्या हक्काबाबत बऱ्याच प्रकारच्या समस्या निर्माण होऊन वाद उत्पन्न होतात.
अशा प्रकारचे वाद पती-पत्नीमध्येच नाही तर मुले आणि आई-वडील किंवा भावांमध्ये किंवा भावा-बहिणींमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या वादांच्या पार्श्वभूमीवर मात्र मालमत्तेबाबत कायदेशीर माहिती असणे खूप गरजेचे असते.
खासकरून पती-पत्नीच्या बाबतीत जर मालमत्तेवरून भांडणे किंवा वाद उद्भवले तर मात्र यासंबंधीचे कायदे खूप महत्त्वाचे आहेत व त्याची थोडक्यात माहिती आपण बघू.
पती-पत्नीमध्ये संबंध बिघडले तर पती-पत्नीला किंवा पत्नी पतीला घरातून बाहेर काढू शकते का?
मुंबई येथे मागील काही वर्षांपूर्वी एका मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये घरगुती वादाचे एक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणांमध्ये पती आणि पत्नी असे दोघे मिळून एकत्रपणे घराची खरेदी केलेली होती व दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पत्नीने पतीला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.
तेव्हा या प्रकरणांमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले होते की, पतीला त्या घरावर कायदेशीर अधिकार आहे आणि त्याला घराबाहेर काढता येणार नाही व पुढे न्यायालयाने म्हटले होते की, पत्नी आणि मुली यांच्यासोबत पतीने राहणे हे त्याचे नैतिक कर्तव्य आहे. जेणेकरून तो त्यांची काळजी घेऊ शकेल.
या प्रकरणामध्ये महिला व तिच्या मुली वेगळ्या रहात होत्या व न्यायालयाने पतीला त्याच्या पत्नीला महिन्याला 17000 रुपये मेंटेनन्स म्हणजेच पोटगी देण्याचे आदेश दिले व हे प्रकरण ऑगस्ट 2021 मध्ये महिलेने पहिल्यांदा कोर्टात नेले होते व तेव्हापासून त्यांचा देखभालीचा खर्च देण्याचा कोर्टाने आदेश दिला होता.
मग यामध्ये नेमका कायदा काय आहे?
भारतामध्ये पत्नीला तिच्या पतीच्या मालमत्तेवर फक्त कायद्याच्या अधिकाऱ्याखालीच अधिकार देण्यात आलेले आहेत. लग्नानंतर जर पती-पत्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर महिला हिंदू विवाह कायद्याच्या कलम 24 अंतर्गत पत्नीला पतीकडून मेंटेनन्स किंवा पोटगी मागण्याचा अधिकार आहे.
इतकेच नाही तर घरगुती हिंसाचार कायदा आणि 125 सीआरपीसी अंतर्गत महिला पतीकडून आयुष्यभर पोटगी मागू शकते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, 1956 अंतर्गत जर बघितले तर हिंदू पत्नीला वैवाहिक घरात राहण्याचा अधिकार आहे. मग ते घर तिच्या मालकीचे असो अगर नसो.
तसेच तिच्या सासऱ्यांचे घर तसेच वडिलोपार्जित मालमत्ता, संयुक्त कुटुंबाची मालमत्ता आहे, मग ते स्वखर्चाने कमावलेली संपत्ती असो वा नसो या सगळ्यांमध्ये जोपर्यंत पत्नीचे तिच्या पतीसोबत वैवाहिक संबंध आहे तोपर्यंत पत्नीला तिच्या सासरच्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि जर काही कारणास्तव पत्नी पतीपासून वेगळीच झाली तर मात्र तिला पोटगी मागण्याचा अधिकार देखील आहे व ती पोटगी मागू शकते.
दुसरे महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतः मिळवलेली मालमत्ता असेल मग ती जमीन असो किंवा घर, पैसा तसेच दागिने काहीही असो ती पूर्णपणे ज्याने मिळवली आहे त्याच्या मालकीची असते.
अशी व्यक्ती त्याची मालमत्ता विकूही शकतो किंवा ती गहाण देखील ठेवू शकतो किंवा एखाद्याला दान देखील देऊ शकतो किंवा मृत्युपत्र लिहून तिचे हस्तांतर किंवा वाटप करू शकतो. स्वतः कमावलेल्या प्रॉपर्टी संबंधीचे सर्वाधिकार ती व्यक्ती राखून ठेवू शकते.