Pune Metro News : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महत्वाचे म्हणजे या मेट्रो मार्गांचा विस्तारही केला जाणार आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यान ही मेट्रोमार्ग तयार होणार असून याच प्रस्तावित करण्यात आलेल्या विस्तारित मेट्रोमार्गासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.
ते म्हणजे या विस्तारित मेट्रो मार्गावर एक नवीन स्थानक तयार होणार आहे. बालाजी नगर येथे असणाऱ्या भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर हे नवीन स्थानक तयार होणार आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांना या स्थानकाचा फायदा होणार आहे.
मात्र या नवीनस्थानकामुळे स्थानकांमधील अंतरावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान आता महा मेट्रो कडून या विविध स्थानकांमधील अंतर निश्चित करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा विस्तारित मेट्रो मार्ग 5.65 किलोमीटर लांबीचा आहे.
या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थातच डीपीआरमध्ये मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित होती. मात्र, लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांच्या आग्रहास्तव बालाजीनगर येथील स्थानक निश्चित करण्यात आले.
मात्र, पद्मावती ते कात्रज हे अंतर अवघे १.९ कि.मी असल्याने नव्याने बालाजीनगर येथील स्थानकामुळे दोन स्थानकांमधील अंतरामध्ये किती फरक असणार, यावरून चर्चा होती. पण आता या सर्व स्थानकांमधील अंतर निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार स्वारगेट ते मार्केट यार्ड हे पहिले स्थानक १.३१ किलोमीटर अंतरावर असून, मार्केट यार्ड ते पद्मावती २.११ किलोमीटर, पद्मावती ते भारती विद्यापीठ १.२३ किलोमीटर आणि भारती विद्यापीठ ते कात्रज १ किलोमीटर अंतर असेल.
त्यानुसार नजीकच्या आणि जास्त अंतरासाठी किती दर असणार, याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी नुकतीच दिली आहे. या मेट्रो मार्गासाठी 2954 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पण नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या स्थानकाचा या खर्चात समावेश नाही. आता या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या बालाजी नगर येथील स्थानकाच्या खर्चाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्ग केला जाणार आहे. या मेट्रोमार्गाबाबत बोलायचं झालं तर हा पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग राहणार आहे.
यासाठी सध्या जमिनीचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण केले जात आहे. हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज हा प्रवास वेगवान होणार असून या भागातील नागरिकांना या मेट्रो मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर हा भाग वाहतूक कोंडीतून मुक्त होईल असाही विश्वास येथील स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.