स्पेशल

गुड न्युज ! 1-2 नाही पुण्यात तयार होणार 10 नवे मेट्रो मार्ग, पुण्यातील ‘हे’ भागही आता मेट्रोने जोडले जाणार

Published by
Tejas B Shelar

Pune Metro News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून संपूर्ण जगात नावारुपाला आलेले एक शांत शहर. मात्र काळाच्या ओघात पुण्याचीही मुंबई झाली आहे. पुण्यातही आता वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून याच वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो मार्गांची उभारणी केली जात आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रोमार्ग कार्यान्वित आहेत आणि येत्या काही महिन्यांनी एक नवा मेट्रो मार्ग कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

मंडळी सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत असून आगामी काळात शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरही मेट्रो धावताना दिसणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी यादरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएकडून मेट्रो मार्ग विकसित केला जात असून या मेट्रोमार्ग प्रकल्पाचे काम पीपीपी अर्थातच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर केले जात आहे.

पीपीपी तत्त्वावर हे काम टाटा समूहाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही दिवसांनी हा देखील मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे पुण्यात आणखी 276 किलोमीटर लांबीचे नवे मेट्रो मार्ग विकसित होणार आहेत.

पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या ठिकाणांना मेट्रो ने जोडण्यासाठी हे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढच्या ३० वर्षांसाठीचा आराखडा सादर करण्यात आला.

यामध्ये 276 किलोमीटर लांबीचे नवे मेट्रो मार्ग प्रकल्पाचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. दरम्यान, आता आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कोणते 10 नवीन मेट्रो मार्ग तयार केले जाणार याची माहिती जाणून घेणार आहोत.

हे 10 मार्ग विकसित केले जाणार !

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात 276 किलोमीटर लांबीचे नवीन दहा मेट्रो मार्ग तयार होणार आहेत. आता आपण ते 10 मार्ग कोणते हे पाहुयात. १. वनाज ते चांदणी चौक २. रामवाडी ते वाघोली ३. जिल्हा न्यायालय ते येवलेवाडी ४. विद्यापीठ चौक ते देहू रोड५. खराडी ते खडकवासला६. निगडी ते चाकण७. हडपसर ते सासवड रोड८. हडपसर ते लोणी काळभोर ९. जिल्हा न्यायालय ते आळंदी १०. वाकड चौक ते शेवलेवाडी हे मेट्रो मार्ग आगामी काळात तयार होणार आहेत.

महत्वाची बाब अशी की, या नव्या प्रस्तावित मार्गीकांमध्ये पुणे शहरातल्या मार्गिकांसोबतच पुण्यातील मेट्रो स्थानकांना पुणे शहराबाहेरील ठिकाणांशी जोडणाऱ्या मार्गिकांचाही समावेश आहे.

यामुळे शहर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे. दरम्यान या सर्व मार्गिकांची एकूण लांबी ही २७६ किलोमीटर इतकी राहणार आहे. यातील वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे आधीच पाठवण्यात आला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com