पुण्यातील ‘या’ विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम सुरु ! पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांचा प्रवास होणार वेगवान

राज्य शासनाने पुण्यातील मेट्रोचे जाळे आणखी मजबूत व्हावे या अनुषंगाने स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने गेल्या वर्षीच मान्यता दिलेली होती. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी या प्रकल्पाला केंद्रातील सरकारकडून मान्यता मिळाली होती.

Tejas B Shelar
Published:
Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील दोन महत्त्वाचे मेट्रो मार्ग नुकतेच सुरू झाले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. तसेच वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू झालाय.

यामुळे शहरातील नागरिकांना जलद कनेक्टिव्हिटी चा लाभ मिळतोय. या मार्गांमुळे शहरातील दैनंदिन मेट्रोची प्रवासी संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब अशी की या मार्गाचा विस्तारही सुरू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी पर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम नुकतेच सुरू झाले असून येत्या काही वर्षांनी हा मेट्रो मार्ग देखील पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य शासनाने पुण्यातील मेट्रोचे जाळे आणखी मजबूत व्हावे या अनुषंगाने स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

याला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने गेल्या वर्षीच मान्यता दिलेली होती. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी या प्रकल्पाला केंद्रातील सरकारकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर, पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर २०२३ रोजी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली.

पुढे ६ मार्च २०२४ रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. मे २०२४ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात झाली. पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक या विस्तारित ४.५ किमी एलिव्हेटेड मार्गिकेचे काम आता जलद गतीने सुरू झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पअंतर्गत आतापर्यंत २८ ठिकाणी पाया बांधण्याचे, १३ पिलर, २०१ सेगमेंट कास्टिंग करण्याचे काम करण्यात येत आहे. विशेष बाब अशी की काम सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम अवघ्या अडीच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने ठेवलेले आहे.

अर्थातच 2026 मध्ये या विस्तारित मेट्रो मार्गाचे पूर्ण काम होणे अपेक्षित आहे. हा मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड करांना जलद गतीने निगडी पर्यंत पोहोचता येणार आहे. तसेच निगडी ते स्वारगेट दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe