Pune Railway News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहराला आयटी हब अशी नवी ओळख देखील मिळू लागली आहे. पुणे शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले असल्याने आता शहराला आयटी हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
या शहरात शिक्षण, उद्योग अन कामानिमित्त बाहेरील राज्यातील आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो नागरिक वास्तव्याला आहेत. विदर्भातीलही जनता मोठ्या प्रमाणात शिक्षण आणि कामानिमित्त पुण्यात आहे.
दरम्यान, याच जनतेसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा प्रवास जलद होईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
पुणे-नागपूर उन्हाळी विशेष गाडी 19 एप्रिल ते 14 जून या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
तसेच नागपूर-पुणे उन्हाळी विशेष गाडी 18 एप्रिल ते 13 जून या कालावधीत चालवली जाणार असून या कालावधीत ही गाडी सोमवार, गुरुवार आणि शनिवारी नागपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
खरे तर ही गाडी आधी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार असे म्हटले गेले होते. पण मध्य रेल्वेने आपल्या आधीच्या निर्णयात बदल केला असून आता नवीन निर्णयानुसार ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे.
त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
दरम्यान उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की या मार्गावर प्रवाशांची संख्या आधीच्या तुलनेत दुपटीने वाढते. त्यामुळे मध्य रेल्वेने या मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा साहजिकच प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार या विशेष गाडीला उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या बारा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा फायदा होऊ शकणार आहे.