Pune Successful Farmer : शेती व्यवसायात जर योग्य नियोजन आखलं तर कमी शेत जमिनीतूनही लाखोंची कमाई केली जाऊ शकते. अलीकडे नवयुवक शेतकरी हे सिद्ध देखील करत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका नवयुवक तरुणाने देखील शेतीमध्ये असाच एक भन्नाट प्रयोग केला असून मात्र 35 गुंठ्यात आठ लाखांची कमाई करून दाखवली आहे.
खरं पाहता पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत राहतात. असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग इंदापूर तालुक्याच्या मौजे निमगाव केतकी येथील सिद्धार्थ माणिक भोसले या तरुण शेतकऱ्याने केला आहे. सिद्धार्थ यांनी आपल्या 35 गुंठ्यात पेरूची लागवड केली असून यातून त्यांना आठ लाखांपर्यंतची कमाई झाली आहे.
साहजिकच सध्या या तरुण शेतकऱ्याचा हा प्रयोग पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे. सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जारवी रेड या जातीच्या 400 पेरू रोपांची आपल्या 35 गुंठे शेत जमिनीत लागवड केली. या पेरूच्या बागेतून त्यांनी आतापर्यंत तिसऱ्यांदा उत्पादन घेतलं असून हा चौथा बहार सुरू आहे. दरम्यान या चौथ्या बहारातून त्यांना दर्जेदार असे उत्पादन मिळाला आहे. 14 ते 15 टन उत्पादन त्यांना हाती आलं असून 70 रुपये प्रति किलो पर्यंतचा दर त्यांच्या पेरूला मिळत आहे.
दरम्यान या चौथ्या बहरासाठी त्यांना तीन लाखांपर्यंतचा उत्पादन खर्च आला आहे. यामध्ये खत खाद्य मजुरी यांचा समावेश आहे. यावर्षी त्यांच्या पेरूला चांगला दर मिळाला असल्याने यातून त्यांना जवळपास आठ ते साडेआठ लाखांची कमाई झाली आहे. म्हणजेच खर्च वजा जाता अवघ्या 35 गुंठ्यात पाच लाखांपर्यंतचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.
या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की, सिद्धार्थ आपल्या बागेत तणनाशकाची फवारणी करत नाहीत. एवढेच नाही तर ते सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर करतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 70 टक्के सेंद्रिय खताचा आणि 30% रासायनिक खतांचा वापर त्यांनी आपल्या पेरूबागेतून उत्पादन मिळवण्यासाठी केला आहे.
यामुळे पेरूची गुणवत्ता चांगली असल्याचा दावा त्यांनी केला.पेरू उत्पादित करण्यासाठी रासायनिक खतांचा अतिशय कमी वापर केला असल्याने हे पेरू अधिक काळ टिकण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी उत्पादित केलेला पेरू राज्यातील मोठमोठ्या बाजारात तसेच बडोदा बंगलोर दिल्ली गोवा या ठिकाणी मोठ्या मागणीत आहेत.
या नवयुवक तरुणाने केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यातून तसेच परराज्यातून शेतकरी त्यांच्या बांधावर हजेरी लावत आहेत. निश्चितच, नवयुवक तरुणाने केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.