Radhakrishna Vikhe Patil News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता पाच दिवस उलटलेत. मात्र, अजून महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. पण, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भारतीय जनता पक्षाचा राहणार असे संकेत मिळत आहेत.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्या असून मुख्यमंत्री भाजपाचाच होईल आणि मंत्री देखील भारतीय जनता पक्षाचे जास्त राहणार आहेत, असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी देखील आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर असल्याचे संकेत दिलेत. शिंदे यांनी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आपला पाठिंबा राहील असे म्हणत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला आपले समर्थन असल्याचे संकेत काल दिलेत.
अशातच आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रीय झाले आहेत.
त्यांनी नुकतीच लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिला आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद आहे. मला दिलेल्या संधीत मी चांगल काम करून दाखवलय. तो विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व व्यक्त करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री पदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहेत.
त्यामुळे वेगळ मागण्याचे कारण नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्याबद्दल विश्वास असून निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर भाष्य केले.
ते म्हणालेत की, माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. मात्र ते नाराज असण्याचे काही कारण वाटत नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल, तो मी मान्य करील अशी भुमिका त्यांनी नुकतीचं घेतली आहे.
शिवाय मुख्यमंत्री पदासाठी आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम वर खापर फोडणाऱ्या विरोधकांना देखील चांगलेच फैलावर घेतले आहे.