राहुल गांधी यांनी ‘या’ शेअर्समध्ये केलीय मोठी गुंतवणूक; अदानी अन अंबानीच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे का ? पहा रागांचा संपूर्ण पोर्टफोलिओ

Tejas B Shelar
Published:
Rahul Gandhi Portfolio

Rahul Gandhi Portfolio : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काही जागांवरील अधिकृत उमेदवारांची नावे अद्याप जाहीर होणे बाकी आहे. पण, लवकरच राजकीय पक्ष आपल्या सर्वच अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. तसेच ज्या लोकसभा मतदार संघात अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झाले आहेत त्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज देखील भरला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देखील लोकसभा निवडणुकीसाठी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल अर्थातच 3 एप्रिल रोजी केरळमधील वायनाड येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपत्तीची देखील माहिती निवडणुक आयोगाला दिली आहे. गांधींनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शेअर्स, गोल्ड बॉण्ड्स आणि म्युच्युअल फंडात सुद्धा मोठी गुंतवणूक केली आहे.

राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 25 शेअर्स आहेत, ज्यामध्ये त्यांनी 4.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत, आज आपण रागा यांच्या पोर्टफोलिओ मध्ये कोणकोणते शेअर्स आहेत आणि कोणत्या शेअर्समध्ये त्यांनी सर्वाधिक गुंतवणूक केली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राहुल गांधी यांची कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक

काँग्रेसचे वायनाड येथील अधिकृत उमेदवार अन ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी टाटा, आयसीआयसीआय बँक आणि अनेक लार्ज कॅप शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांनी काही स्मॉल कॅप फंडांमध्येही गुंतवणूक केली आहे. टाटा स्टॉक्समध्ये त्यांची 16.65 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक असून त्यांच्याकडील या शेअर्सची संख्या 4,068 एवढी आहे.

तसेच त्यांच्याकडे ITC चे 3,039 शेअर्स, ICICI बँकेचे 2,299 शेअर्स आहेत. त्यांची ITC मध्ये 12.96 लाख आणि ICICI मध्ये 24.83 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. शिवाय त्याच्या पोर्टफोलिओमध्ये अल्काइल अमाइन्स, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिवीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टायटन अशा कंपनीचे स्टॉक्स सुद्धा आहेत.

अदानी, अंबानी यांच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे का

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अदानी आणि अंबानी समूहाच्या कंपनीचा एकही स्टॉक नाही हे विशेष. खरंतर, राहुल गांधी अदानी आणि अंबानी यांचा जोरदार विरोध करतात.

यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये अदानी आणि अंबानी यांचे शेअर्स आहेत की नाही याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. दरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये अदानी आणि अंबानी यांचे शेअर्स नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक

राहुल यांच्याकडे पिडीलाइटचे एकूण 1,474 शेअर्स असून याची किंमत ही 43.27 लाख रुपये एवढी आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असणाऱ्या या शेअर्सची किंमत सर्वात जास्त आहे. तसेच, त्यांच्याकडे बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सचे अनुक्रमे 551 आणि 1,231 शेअर्स आहेत ज्याची किंमत अनुक्रमे 35.89 लाख आणि 35.29 लाख रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे 55 हजार रुपयांची रोख रक्कम आहे आणि त्यांनी एसबीआय, एचडीएफसी बँकेत 26.25 लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे.

त्यांनी सात म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी एएमसी, पीपीएफएएस आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीमध्ये 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. टपाल बचत, एनएसएस, दागिन्यांसह गांधींची एकूण गुंतवणूक 9.24 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांनी गोल्ड बॉण्ड मध्ये देखील गुंतवणूक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe