स्पेशल

राहुरी आणि गणेश कारखान्‍यावर आरोप करणारे कारखान्‍याच्‍या बोगद्यातून चोरी गेलेल्‍या साखरेचे उत्‍तर तालुक्‍याला का देत नाही ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी आणि गणेश कारखान्‍यावर आरोप करणारे आपल्‍या  कारखान्‍याच्‍या बोगद्यातून चोरी गेलेल्‍या साखरेचे उत्‍तर तालुक्‍याला का देत नाही? तालुक्‍याप्रती तुम्‍हाला कोणतेही प्रेम राहीलेले नाही. केवळ तिरस्‍कार करुन, दहशत निर्माण करण्‍याची तुमची पध्‍दत आता जनतेने ओळखली आहे. तुमची चाळीस वर्षांची नाकामी आता उघडी पडली असल्‍याचा आरोप डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला.

धांदरफळ येथे आयोजित केलेल्‍या युवा संकल्‍प मेळाव्‍यात डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुन्‍हा एकदा आ.थोरातांच्‍या निष्‍क्रीयतेवर बोट ठेवून तीन सभांमधून विचारलेल्‍या एकाही प्रश्‍नाचे उत्‍तर देवू  न शकल्‍या बद्दल परखड टिका केली. ही तर आत्‍ता सुरुवात आहे. परंतू डोक्‍यावर पडल्‍याचा आरोप माझ्यावर करणा-यांचे डोके बंद पाडल्‍याशिवाय मी स्‍वस्‍थ बसणार नाही असा इशाराही त्‍यांनी दिला.

तालुक्‍यात युवकांचे वादळ आता सुरु झाले आहे. कोणीही थांबायला तयार नाही. प्रत्‍येक माणूस तुमच्‍या दहशतीला झुगारुन बाहेर पडला आहे. तुम्‍ही कोणाकोणाला थांबविणार चाळीस वर्षात तुम्‍ही ज्‍यांना फोन केले नाही त्‍यांना आता फोन सुरु झाले आहे. ज्‍यांना कधी विचारले नाही ज्‍यांना आता काय पाहीजे अशी विचारणा होवू लागली आहे. माझा दौरा जिथे असतो तिथे लोकांना रोखण्‍यासाठी आता यांची यंत्रणा सक्रिय झाली. पण तुम्‍हाला आता यश येणार नाही.

आमच्‍या भागात आल्‍यावर कायम राहुरी आणि गणेश कारखाना बंद पाडल्‍याचा आरोप आमच्‍यावर केला जातो. संस्‍था कशा चालवायच्‍या  आम्‍हालाही कळतात, पण तुमच्‍या कारखान्‍याच्‍या बोगद्यातून हजारो व्किटल साखर चोरीला गेलीच कशी असा सवाल करुन, अनेक वर्षे तालुका याचे उत्‍तर मागत आहे. अमृतवाहीनी बॅकेचे चेअरमन बॅक घोटाळ्यात तुरुंगात गेला कसा, भ्रष्‍ट्राचार कोणी केला, मग तुमच्‍या संस्‍था चांगल्‍या कशा, तीन सभांमधून विचारलेल्‍या प्रश्‍नांला फक्‍त बगल देण्‍याचे काम या तालुक्‍यातील आमदार करीत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

घुलेवाडी सभेचा उल्‍लेख करुन डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, यातालुक्‍यात डोंगर द-या आणि दुष्‍काळी भाग असल्‍याचा उल्‍लेख केला जातो ही तुमच्‍या चाळीस वर्षांची नाकामी आहे. वर्षानुवर्षे या तालुक्‍यातील महीलांच्‍या डोक्‍यावरील हंडा तुम्‍ही उतरवू शकला नसलयामुळे ही जबाबदारी आता मी घेणार आहे. या तालुक्‍यातील युवक त्‍यांच्‍या  भवितव्‍यासाठी यंदा मतदान करतील असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

बाहेरुन आल्‍याचा आरोप आमच्यावर करता मग कारखान्‍याची स्‍थापना करताना पद्मश्री कसे चालले. आमच्‍या संस्‍थेवर टिका करता पण ज्‍या गणेश कारखान्‍याची जबाबदारी आमदारांनी घेतली त्‍याचा भाव त्‍यांनी फक्‍त  २८०० रुपये दिला. त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या कारखान्‍यातील ३०१० रुपये दिला. प्रवरा कारखान्‍याने मात्र ३२०० रुपये भाव दिला मग सांगा आता संस्‍था कोणाच्‍या चांगल्‍या. आम्‍ही कतृत्‍वाने मोठे झालो. येथील बाजारपेठ फुलली असेल तर यामागे महायुती सरकारची धोरण आणि योजना कारणीभूत आहेत. लाडक्‍या बहीणींबरोबरच शेतक-यांनाही आर्थिक मदत केली.

आमच्‍याकडे आता विश्‍वासाने माणसं येत आहेत. तुमचे प्रेमही आता लोकांना नकोसे झाले आहे. कारण तुमच्‍या प्रेमामध्‍येही दडपशाही आहे. प्रेमात घेवून काटा काढण्‍याची तुमची प्रवृत्‍ती आता उघड झाली आहे. आमच्‍या सभांना कामगारांना बोलावून हजेरी घेण्‍याची वेळ आलेली नाही. कार्यकर्त्‍यांचा फक्‍त वापर करायचा याचा परिणाम स्‍व.अशोक मोरेंनाही भोगावा लागला.

याची आठवण करुन देत, जेष्‍ठ कार्यकर्त्‍यांला कारखान्‍याच्‍या  निवडणूकीतही आमदारांपेक्षा जास्‍त मतं मिळविले म्‍हणून कसे बाजूला टाकले जाते याची आठवण आता जनतेने ठेवली असल्‍याने तुमच्‍या प्रेमालाही आता लो‍कं घाबरू लागले आहेत. त्‍यामुळेच या तालुक्‍यात आता परिवर्तन अटळ आहे. कुठल्‍याही परिस्थितीत आमदार महायुतीचाच होणार असा दावा त्‍यांनी केला. याप्रसंगी जेष्‍ठनेते वसंतराव देशमुख, रोहीदास डेरे, विक्रमसिंग खताळ, अमोल खताळ, संजय मोरे यांचीही भाषणं झाली. धांदरफळ आणि पंचक्रोशितील गावांमध्‍ये डॉ.सुजय विखे पाटील यांचे जंगी स्‍वागत झाले.

अहमदनगर लाईव्ह 24