Rahuri And Kopargaon News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले असून येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे सरकार स्थापित होईल अशी शक्यता आहे. डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल आणि त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होईल असे बोलले जात आहे. अशा या परिस्थितीतच मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीला पूर्णपणे बाजूला सारले आहे.
जिल्ह्यातील एकूण 12 विधानसभा मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघावर महायुतीचा बोलबाला राहिला आहे. या निवडणुकीत अहिल्या नगर जिल्ह्यात चार जागा भारतीय जनता पक्षाला, चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि दोन जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्या आहेत.
जिल्ह्यातील दहा जागा महायुतीने जिंकल्या असून बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा देखील या निवडणुकीत पराभव झालाय. बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते.
मात्र त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला असल्याने विरोधात असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राहुरी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी अर्ज सादर केला आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
या निवडणुकीत कर्डिले यांनी तनपुरे यांचा पराभव केला. तर दुसरीकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे संदीप वर्पे आणि महायुतीकडून अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
या ठिकाणी काळे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले असून त्यांनी वर्पे यांचा पराभव केला. दरम्यान या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी आता ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे या दोन्ही पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी म्हणजेच फेरतपासणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
यामुळे सध्या या EVM पडताळणी अर्जाबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर राहुरी विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांची ईव्हीएम फेरतपासणीची मागणी हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.