Railway Insurance:- भारतीय रेल्वे हे जगातील सगळ्यात मोठे रेल्वे नेटवर्क असून भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारताच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत तर पश्चिमे पासून तर पूर्वेपर्यंत भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले असल्याने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात व मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे योगदान आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिले तर सातत्याने रेल्वेचे अपघात घडताना आपल्याला दिसून येत आहे व यामध्ये बऱ्याच प्रवाशांचा जीव देखील गेल्याचे आपण बघितले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने प्रवास करावा की नाही हा देखील एक मोठा प्रश्न प्रवाशांमध्ये निर्माण होणार नाही तर नवलच.
या सगळ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जर आपण भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी असलेल्या सोयी सुविधांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता विम्याची सुविधा देखील देण्यात येते. विशेष म्हणजे हा विमा अवघ्या 45 पैशांत दिला जातो व या माध्यमातून दहा लाख रुपयांचा कव्हर मिळतो. याच रेल्वे इन्शुरन्स बद्दलची माहिती आपण घेणार आहोत.
काय आहे रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स?
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स देते व याचा लाभ अशा प्रवाशांना मिळतो जे तिकीट बुक करताना विम्याचा पर्याय निवडत असतात. परंतु बऱ्याच प्रवाशांना या विम्याबद्दल अजून पर्यंत काहीच माहिती नसल्याने या सुविधेपासून बरेच प्रवासी वंचित राहतात.
कारण जेव्हा आपण तिकीट खरेदी करतो तेव्हाच हा विमा आपल्याला खरेदी करावा लागतो याकरिता 45 पैसे द्यावे लागतात. तसेच यामध्ये रेल्वेचा प्रवास विमा हा जे प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करतात त्यांनाच मिळतो. जे प्रवासी तिकीट खिडकीवरून तिकीट घेत असतील त्यांना या विम्याचा लाभ मिळत नाही.
दुसरे म्हणजे विमा घ्यावा की नाही हे संपूर्णपणे प्रवाशांवर अवलंबून आहे. याकरिता 45 पैशांचा प्रीमियम असून जनरल कोच व डब्यांमधील प्रवाशांना याचा लाभ मात्र मिळत नाही. या विम्याअंतर्गत रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 124 आणि 124 A अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते.
या विम्याच्या माध्यमातून किती मिळते नुकसान भरपाई?
1- रेल्वेची दुर्घटना घडली व त्यावेळी जर मृत्यू आला तर भरपाई म्हणून पाच लाख रुपये, एखादा प्रवासी गंभीर जखमी झाला तर त्याला अडीच लाख रुपये तर किरकोळ जखमीला पन्नास हजारांची मदत देण्यात येते.
2- तसेच अनुचित प्रकारामुळे मृत्यू ओढवल्यास दीड लाख रुपये तर गंभीर दुखापत झाली तर 50 हजार व किरकोळ जखमीला पाच हजार रुपये भरपाई देण्यात येते.
3- दुर्घटनेवेळी विम्याची रक्कम देण्यात येते व ऑनलाईन तिकीट बुकिंग वेळी प्रवासी हा पर्याय निवडू शकतात. जर अपघात झाला व त्यामध्ये मृत्यू झाला तर वारसाला दहा लाख रुपये मिळतात.
4- एखाद्या वेळेस पूर्णतः अपंगत्व आलेले असेल तर व्यक्तीला दहा लाख रुपयांचा विमा मिळतो. दुर्घटनेमुळे जर अंशिक स्वरूपाचे अपंगत्व आले असेल तर साडेसात लाख रुपये विम्यापोटी दिले जातात. तसेच जखमी आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असेल दोन लाख रुपये या माध्यमातून मिळतात.