स्पेशल

महाराष्ट्रातील रेल्वे सुसाट, रेल्वे प्रकल्पाला १५,९४० कोटींचा निधी, मुंबईत चार नवे टर्मिनस उभारणार !

Published by
Ahmednagarlive24 Office

यंदाच्या अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या भरघोस निधीमुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना चांगली गती प्राप्त होणार आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाला १५ हजार ९४० कोटींचा निधी देण्यात आला असून येत्या पाच वर्षांत २५० अतिरिक्त लोकल आणि चार मेगा टर्मिनस उभारून शंभर मेल-एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे राज्यातील जनतेची वाढत्या गर्दीतून सुटका होऊन आधुनिक सुविधा प्राप्त होणार असल्याचे सुखद चित्र यामुळे दिसत आहे.

मंगळवार, २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये भारतीय रेल्वेसाठी २,६२,२०० अटींची भांडवली गुंतवणुकीची तरतूद केली. या पहिल्या अर्थसंकल्पावर बुधवारी पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, यूपीए सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पासाठी १,१७१ कोटी रुपयांची तरतूद होती.

मात्र, यावेळी महाराष्ट्राला रेल्वेसाठी १५ हजार ९४० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच एका वर्षात १३० किमी नवीन मार्ग तयार होत असून अमृत भारत योजनेंतर्गत तब्बल १२८ स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.

याशिवाय महाराष्ट्रात रेल्वेचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले. रेल्वेची राज्यात सध्या १ लाख ३० हजार कोटींची गुंतवणूक असल्याचे देखील अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. याशिवाय, राज्यातील विविध प्रकल्पांना यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधी देण्यात आला असून यामध्ये नवीन रेल्वे रूळ, विद्युतीकरण अशी कामे केली जाणार आहेत.

या कामांसोबत ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास, पुणे-लोणावळा तिसरी-चौथी मार्गिका, बेलापूर-सीवूड्स उरण मार्गिकेचे विद्युतीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच ८१ हजार ५८० कोटी रुपयांच्या नवीन मार्गिका, रेल्वे मार्गिकचे दुहेरी आणि चौपदरीकरण, रेल्वे कॉरिडॉर अशा अनेक प्रकल्पांचा यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश आहे.

येत्या पाच वर्षांत मुंबईकरांच्या सोयीसाठी एमयूटीपी अंतर्गत विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. लोकल आणि मेल-एक्स्प्रेसकरिता स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान ५वा-६वा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहे. विविध प्रकल्पांमुळे येत्या पाच वर्षांत उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकलच्या नवीन २५० फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना गर्दीतून काहीसा दिलासा मिळेल, असा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला आहे

मुंबई आणि पुण्यात ८ मेगा टर्मिनस उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकट्या महामुंबईत चार टर्मिनास असणार आहेत. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने संभाव्य जागांची निवड केली आहे. मध्य रेल्वेने नव्या टर्मिनससाठी मुलुंड, परळ, ठाकुर्ली ही संभाव्य ठिकाणे निश्चित केली आहेत.

पश्चिम रेल्वेवरील नव्या टर्मिनससाठी वसई रोड परिसरातील टर्मिनस प्रस्तावित केला आहे. मेगा टर्मिनसकरिता अंदाजे ७.५ एकर जमिनीची आवश्यकता आहे. या टर्मिनसमुळे नवीन १०० मेल-एक्स्प्रेस गाड्या चालवणे शक्य होणार आहे.

Ahmednagarlive24 Office