Ram Mandir Ayodhya : रामजन्मभूमी मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात आणि देशातील अनेक ‘अति-अतिमहत्त्वा’च्या व्यक्तींच्या उपस्थितीत होणार असून, त्या दृष्टीने या सोहळ्यात अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
रामजन्मभूमी मंदिर परिसरात कोणत्याही अनधिकृत वाहनास प्रवेश करता येऊ नये, याकरिता तेथे ‘बूम बॅरियर’, ‘टायर किलर’, तसेच ‘बोलार्ड’ बसवण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेश बांधकाम महामंडळाचे सरव्यवस्थापक सी. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, या सोहळ्यास लाखो लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य अति-अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, तसेच सेलिब्रेटीची मांदियाळी येथे जमणार आहे.
अशा परिस्थितीत या सोहळ्यात कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर तो या उपाययोजनांद्वारे हाणून पाडण्यात येईल. रामलल्लाच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी येथे विविध प्रकारची सुरक्षा उपकरणे लावण्यात आली आहेत वाहनांची खालची बाजू तपासणारे ‘अंडर व्हेईकल स्कॅनर’ रस्त्यांवर बसवण्यात येणार आहेत.
त्यामुळे एखादे वाहन जन्मभूमी पथावर येताच त्याची तत्क्षणी तपासणी होईल. त्या वाहनात जर काही आक्षेपार्ह वस्तू असेल, तर ती लगेच रोखण्यात येईल. याशिवाय या ठिकाणी बूम बॅरियर, बोलार्ड आणि टायर किलरही बसवण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
याच प्रमाणे सर्वत्र ‘क्लोज्ड सर्किट टीव्ही’ (सीसीटीव्ही) यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या परिसरात रेड झोन आणि यलो झोन असे दोन भाग करण्यात आले असून, तेथील नियंत्रण केंद्रांतून संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संचालन केले जाईल. या कॅमेऱ्यांतून टिपलेली सुमारे ९० दिवसांची दृश्ये या ठिकाणी साठवण्याची सोय आहे, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
वाहनरोधक सुरक्षा यंत्रणा
रामजन्मभूमी मंदिर परिसरात रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या बूम बॅरियरवर (टोल नाक्यांवर असतात तत्सम आडव्या दांड्या) एखादे वाहन धडकल्यास, तीन सेकंदांत रस्त्यास समतल असे बसवण्यात आलेले बोलार्ड म्हणजे स्टीलचे जाड खांब बाहेर येतील. त्याचवेळी तेथील टायर किलरही बाहेर येतील.
टायर किलर हे रस्त्याला लावलेले असतात. छोट्याशा वेगरोधकांप्रमाणे ते असतात. मात्र त्यांत पोलादाच्या अणुकूचीदार नख्या लावलेल्या असतात. वेगाने आलेले वाहन बोलार्डवर आदळेल, त्याचवेळी त्याचे टायर फुटतील आणि ते तिथल्या तेथे रोखून आतील व्यक्तीना ताब्यात घेता येईल. अशा प्रकारे ही सुरक्षा यंत्रणा काम करते.