मला मुख्यमंत्री शेजारी बंगला अन सर्वात मोठ ऑफिस; विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची चौफेर फटकेबाजी

राम शिंदे म्हणालेत की सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित झाल्याने यातून एक वेगळा आणि अतिशय चांगला संदेश जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यामुळे कर्जत जामखेड मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य लोकांच्या मनात शल्य होतं, लोकांना दुःख झालं होतं. पण कर्जत जामखेडचा भूमिपुत्र म्हणून मी जरी यशस्वी झालो नाही तरी अहिल्यानगरचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रात मी यशस्वी झालोय.

Tejas B Shelar
Published:
Ram Shinde News

Ram Shinde News : कर्जत जामखेडचे माजी विधानसभा आमदार , विधान परिषदेचे आमदार अन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नगरमध्ये सत्कार सोहळा आयोजित केला. यावेळी सभापती राम शिंदे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत या सत्काराबद्दल नगर मधील सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानलेत. राम शिंदे म्हणालेत की सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित झाल्याने यातून एक वेगळा आणि अतिशय चांगला संदेश जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यामुळे कर्जत जामखेड मधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य लोकांच्या मनात शल्य होतं, लोकांना दुःख झालं होतं. पण कर्जत जामखेडचा भूमिपुत्र म्हणून मी जरी यशस्वी झालो नाही तरी अहिल्यानगरचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्रात मी यशस्वी झालोय.

राजेंद्र दादा फाळके म्हणालेत की जेव्हा केव्हा पराजय होतो तेव्हा मोठी संधी प्राप्त होते. मी 2002 साली मार्केट कमिटीचा उमेदवार होतो. मला कोणत्याच पॅनलने घेतलं नाही मी अपक्ष लढलो. मी 2 मतांनी जिंकलो पण रिकाऊंटिंग मध्ये मी 1 मताने हरलो. कारण अपक्षाला गाजावाजा करायला पाठीमागे कोणीच नव्हते. पण मी मार्केट कमिटीला पराभूत झालो त्याच दिवशी तालुक्याचा नेता झालो. 2019 ला विधानसभा निवडणुकीत पराजित झालो आणि नंतर मला विधान परिषदेवर आमदार करण्यात आले. 2024 ला पराजित झालो आणि विधिमंडळ परिसरातील सुप्रीम पावर जी आहे त्या चेअरवर जाऊन मी बसलो.

लोक म्हणालेत की देवाचं काही खरं नाही, पण देवावर माझी अपार अन नितांत श्रद्धा आहे, देवाचं अर्धवट जरी खरं नसलं तरी देवाभाऊचं पूर्ण खरं झालं. नेतृत्वाच्या प्रति श्रद्धा आणि निष्ठा असली की अडचण येण्याचे कारण नाही. म्हणून 2019 ला हरलो तरी मंत्रिपदाच्या चर्चेत होतो. 2024 ला हरल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद, मंत्री पद आणि सभापती पदाच्या चर्चेत होतो. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आढावा बैठकीत राम शिंदेच प्रदेशाध्यक्ष होणार होते पण मी प्रदेशाध्यक्ष झालो अशी कबुली सुद्धा दिली होती. 2014 ते 2024 दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासाठी माझं नाव चर्चेत राहील, पण कोणतही पद मला मिळताना सहजासहजी मिळाल नाही. 2022 ला मी आमदार झालो आणि त्याच दिवशी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

महायुतीचे सरकार आलं आणि मी मंत्री होणार, सभापती होणार अशा चर्चा सुरू झाल्यात. पण मला सभापती व्हायला अडीच वर्षे लागलेत म्हणून कोणतीच गोष्ट सहजच मिळत नाही हे माझ्या पत्रिकेत लिहिलंय असं मला वाटतं. मी 1997 ला पंचायत समिती निवडणूक लढवली. पण 2004 पर्यंत मला पक्षाच कोणतच पद नव्हतं. नंतर मी राज्याचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष झालो, जिल्ह्याचा चिटणीस झालो, 2006 मध्ये मला भाजपा तालुका अध्यक्ष पद मिळालं. 2007 मध्ये माझ्या मिसेस सभापती झाल्यात. पुढे 2009 ला आमदारकी लढवण्याच ठरवलं. आमदारकी लढवण्याचे ठरवलं पण आमदारकी लढवायची म्हटल्यावर लोक हसायचे.

त्यात विठ्ठलराव लंघे सुद्धा होते. तेव्हा ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते म्हणायचे ह्यो कसा व्हायचा आमदार, कारण ते पण इच्छुक होते. पण त्यावेळी मला तिकीट मिळालं. कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले होते काहीही झालं तरी राम शिंदेला तिकीट द्यायचं आणि मला तिकीट दिलं. जसं मला तिकीट दिलं तसे सर्व माणस पक्ष सोडून गेलेत. आमच्याबरोबर पक्षाचे लोक राहिले नाहीत. पण मी जिंकलो. आता मी जसा सभापती झालोय…..पण आता परिस्थिती वेगळी आहे आता सोडून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. कारण मी सर्वोच्च पदावर आहे, मी दोन्ही सभागृहांचा सभेचा पती आहे. माझं सर्व स्वप्न मागेच साकार झाले.

अठराविश्व दारिद्र्य नशीबी आल्यानंतर असं स्वप्न कोण बघू शकत. इतिहासात नगर जिल्ह्याने सर्व शुगर लॉबी, प्रस्थापित, मोठे मोठे दिग्गज राज्याला दिलेत. अन माझ्यासारखा छोटा माणूस, अठराविश्व दारिद्र्य, हलाखीची परिस्थिती असणाऱ्या घरात जन्म, आईबाप आणि माझ्या तिन्ही बहिणी अशिक्षित, मीच एकटा पोस्ट ग्रॅज्युएट. मीच एकटा एमएससी बीएड होतो म्हणून असं स्वप्न सुद्धा बघण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण आता ते साकार झालंय. माझे वडील सालकरी होते, त्यांनी एकाच मालकाकडे 34-35 वर्ष साल घातलेत आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो. कारण ज्याच्या पोटी आपण जन्म घेतला ते सांगायचं गैर काय? 1972 च्या दुष्काळात सुकडीवर जगलेले आम्ही माणसं, आम्ही कस काय असं स्वप्न बघू शकतो.

पण मनात इच्छा, दृढ निश्चय, लक्ष भेदण्याची ताकद आणि इच्छा उराशी बाळगून मी त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत आलोय. खऱ्या अर्थाने अण्णासाहेब डांगे जर चौंडीला आले नसते आणि चौंडीचा विकास करायचं ठरवलं नसतं तर कदाचित मी इथंवर आलो नसतो. 1995 मध्ये मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब आलेत, ग्रामविकास मंत्री म्हणून अण्णासाहेब डांगे आलेत. मी नुकताच पोस्ट ग्रॅज्युएट झालो होतो. त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा, धावणारा, पळणारा, सकारात्मक कार्यकर्ता, एक तरुण म्हणून त्यांच्या नजरेत आलो आणि त्यांनी मला चौंडी विकास प्रकल्पात काम करायचं हे सांगितलं.

आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे त्रिशताब्दी जन्म वर्ष आणि याच वर्षी त्यांच्या माहेरच्या कुळातील मला महाराष्ट्राच्या राजकारणातील एका महत्त्वाच्या पदावर जाण्याचा मान मिळाला. देशात धनगर समाजाला संविधानिक अन पिठासीन अधिकारी म्हणून पहिल्यांदाच मान मिळाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते, पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत अन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार हे मी माझे भाग्यच समजतो. ज्यावेळी मी सरपंच झालो त्यावेळी मी पोपटराव यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणालो आमच्या गावातील दारू बंद करायची आणि तुम्ही भाषणाला या. ते म्हटले येतो अन त्यांच जोरात भाषण झाल.

मलाही पटलं, जरा मी पण जोरात होतो मग मी गावातली दारू बंद करून टाकली. पण त्यांनी कानात सांगितलं होत लय जोरात बंद करू नका. मी म्हणलं बंद करून तर टाकली आता कशी चालू होते बघतोच. गावातली दारू बंद केली पण परिणाम म्हणून 2005 ला माझ्यासहित माझं सर्व पॅनल पडलं. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. जे लोकांना चालेल, जे भावेल तेवढे प्रामाणिकपणे करायचं असं ठरवलं. मी आता सभापती झालोय म्हणून मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही माझ्यासमोर उभा राहायचा अधिकार नाही. माझा माईक चालू असेल तर इतरांचा कोणाचाच माइक चालू नसतो.

पण नेमकं कर्जत जामखेडच्या लोकांनी माझं का ऐकलं नाही हा प्रश्न माझ्या मनात येतो. काही लोक म्हणतात जे झालं ते बरं झालं पण मी तसं समजणाऱ्यातला नाही. माझा पोरगा 2019 ला म्हणाला पप्पा पुढे असणारी आणि मागे असणारी गाडी कुठे गेली. मी म्हणालो आता याला कसं सांगायचं? पण आता नागपूरला गेल्यानंतर त्याला सांगितलं पुढे बघ एक गाडी आहे आणि मागेही एक गाडी आहे. आपण आपल्या गाड्या यावेळी परत आणल्या आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मी कदाचित एकमेव राज्यमंत्री आहे जो राज्यमंत्र्यांचा मंत्री झालायं. मंत्री होऊन कुणाला गाडी आहे तर सेक्युरिटी नाही.

गाडी आणि सेक्युरिटी आहे तर त्याला ऑफिस नाही अन ऑफिस आहे तर राहायला बंगला नाही. कारण आपल्याकडे 42 मंत्री कधीच नव्हते. पण ज्या दिवशी सभापती झालो त्याच दिवशी आदेश काढलेत उद्याच्याला ऑफिस डिमॉलिश करून नवीन ऑफिस करा, आता 25 फेब्रुवारीला पूर्ण ऑफिस तयार होईल. विधिमंडळ परिसरातील सगळ्यात मोठे ऑफिस आता सभापतीचे राहील. कारण सभापतीकडे मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना यावं लागतं म्हणून ते ऑफिस आहे. माझा बंगला ज्ञानेश्वरी आहे, मला ज्ञानेश्वरी बंगला मिळालाय जर मुख्यमंत्र्यांना भेटायला तुम्ही कोणीही आलेत अन लवकर आत नाही सोडलं तर तुम्ही ज्ञानेश्वरी मध्ये येऊ शकता. कारण, माझा बंगला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe