Rameshwar Rao Success Story : मोठ्या गोष्टींची सुरुवात नेहमी छोट्या-छोट्या पावलापासून होते. याची उदाहरणे फक्त भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळाली आहेत. त्यातले एक उत्तम उदाहरण म्हणजे रिअल इस्टेट टायकून म्हणून ओळखले जाणारे रामेश्वर राव.
ज्यांना लहानपणी शाळेत जाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यांनी आपल्या मेहनतीने आज आपले नशीब बदलले, त्यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. आज आपण या थोर व्यक्तीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामेश्वर राव हैदराबादला आले, जिथे त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला. या काळात भारतात रिअल इस्टेट व्यवसायाला वेग आला होता. त्यामुळे जमिनीचे भाव दिवसेंदिवस वाढत होते. मग त्यांनी जोखीम पत्करली आणि 50,000 मध्ये एक प्लॉट विकत घेतला, जो त्यांचे नशीब बदलणारा ठरला. या प्लॉटने त्यांना काही वेळातच तीन पट परतावा दिला. या नफ्यानंतर त्यांनी होमिओपॅथिक क्लिनिक बंद करून रिअल इस्टेटमध्ये स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याची योजना आखली.
1981 मध्ये त्यांनी माय होम कन्स्ट्रक्शन नावाची रिअल इस्टेट कंपनी स्थापन केली. यासोबतच त्यांनी हळूहळू सिमेंटचा व्यवसाय सुरू केला आणि महा सिमेंट नावाने कंपनी स्थापन केली. सध्याच्या काळात या कंपनीची उलाढाल 4000 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज रामेश्वर राव 11,400 कोटी रुपयांचे मालक आहेत. तसेच या कंपनीची वार्षिक उलाढाल 4 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.
जर त्यांनी त्यावेळी तो प्लॉट घेण्याचा निर्णय घेतला नसता, तर आज ते कदाचित हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये होमिओपॅथी क्लिनिक चालवताना दिसले असते. योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाने आज त्यांचे आयुष्य बदलून गेले. आजच्या घडीला रिअल इस्टेट सोबतच अनेक क्षेत्रात त्यांच्या कंपनीचा विस्तार वाढला आहे.