शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे तुमच्याकडे किती क्षेत्र आहे किंवा तुमच्याकडे किती शेती आहे याला महत्त्व नसून तुमच्याकडे आहे ते शेतीत तुम्ही कशा पद्धतीने पिक नियोजन करतात व कोणत्या पिकांचे उत्पादन घेतात याला खूप महत्त्व आहे. कारण आजकालचे शेतकरी अगदी कमीत कमी क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर करून भरपूर उत्पादन मिळवतात.
परंतु बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली पीक लागवड देखील फायद्याची ठरते. शेतकरी आता पारंपारिक पिकांऐवजी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला तसेच फळ पिकांची लागवड करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा सध्या मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.
याच मुद्द्याला धरून जर आपण कडेगाव तालुक्यातील आसद या गावचे तरुण शेतकरी रणजीत जाधव यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी एकरभर टोमॅटो लागवड केलेली होती. परंतु तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापन ठेवून तब्बल 39 टन उत्पादन घेऊन यातून पंधरा लाखाच्या पुढे आर्थिक उत्पन्न देखील मिळवली आहे. यशोगाथा आपण थोडक्यात बघू.
टोमॅटोतून घेतले 15 लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कडेगाव तालुक्यातील आसद या गावचे रणजीत जाधव हे तरुण शेतकरी असून ते नेहमी त्यांच्या शेतामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करतात. साधारणपणे भाजीपाला पिकांमध्ये ते वांगी तसेच शिमला मिरची व टोमॅटो पिकाचा समावेश प्रामुख्याने करतात. अगदी याच पद्धतीने त्यांनी यावर्षी देखील टोमॅटो लागवड करण्याचा निर्णय घेतला व 5 मार्चला अथर्व जातीच्या टोमॅटो पिकाची एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केली.
परंतु या लागवडीचे नियोजन त्यांनी खूप उत्तम पद्धतीने केले. त्यामध्ये त्यांनी मल्चिंग पेपरचा लागवडी करता वापर केला व नंतर तो पेपर अंथरून त्यावर टोमॅटो रोपांची लागवड केली. टोमॅटो लागवड करण्याअगोदर शेतीची योग्य ती मशागत करून एका एकरसाठी सहा ट्रॉली शेणखत वापरले. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकचा वापर केला व त्या ठिबकच्या माध्यमातूनच पाणीच नाही तर विद्राव्य खतांचा पुरवठा देखील त्यांना करता आला.
ठिबकच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आळवणी खते तसेच औषधांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा पिकाला केला व वेळेला आवश्यक असलेल्या भेसळ पद्धतीचे लागवड डोस देखील टोमॅटो पिकाला दिले. पिकांची गरज ओळखून वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या देखील घेतल्या. टोमॅटो पिकासाठी मांडव पद्धतीचा वापर करून काठींचा मांडव घातला व टोमॅटो रोपांची योग्य ती बांधणी करून काळजी घेतली.
व्यवस्थापन अगदी योग्य वेळेला केल्यामुळे झाडावर फळे मोठ्या प्रमाणावर लगडली व त्यांची वाढ देखील चांगली झाली. त्यांनी पिकवलेल्या एका टोमॅटोचे सरासरी वजन 90 ते 100 ग्रॅम पर्यंत पोहोचले होते. इतक्या बारकाईने व्यवस्थापन केल्यामुळे प्रत्येक तोड्याला त्यांना पाच ते सात टन टोमॅटोचे उत्पादन मिळाले.
या सगळ्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांना सरासरी 39 टन उत्पादन घेतले. यातून त्यांना बाजारभाव चांगला मिळाल्याने पंधरा लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. या एकरभर टोमॅटोसाठी त्यांना सर्व मिळून खर्च आला होता तो वजा करून बारा लाख रुपये निव्वळ नफा त्यांना मिळाला.
अशाप्रकारे जर बाजारपेठेचा अभ्यास व वेळेला योग्य व्यवस्थापन ठेवून शेती केली तर भरघोस उत्पादन मिळते व लाखोत नफा देखील मिळवता येणे शक्य होते हे रणजीत यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.