स्पेशल

कर्ज वसुलीसाठी रिकवरी एजंट त्रास देत असेल तर ‘हे’ नियम तुम्हाला मदत करतील…

Published by
Ajay Patil

RBI Rule:- जीवनामध्ये अनेकदा पैशांची गरज भासते तेव्हा आपण बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतो. त्यामध्ये पर्सनल लोन तसेच कार लोन किंवा इतर लोनचा समावेश असतो. साहजिकच जेव्हा आपण अशा प्रकारचे कर्ज घेतो तेव्हा त्याची आपल्याला मासिक हप्त्यांच्या स्वरूपामध्ये परतफेड करावी लागते.

बरेच दिवस आपण नियमितपणे कर्जाची परतफेड करत असतो. परंतु जर काही गोष्टींमुळे आपली आर्थिक घडी विस्कटली तर आपल्याला मासिक ईएमआय भरणे कठीण जायला लागते व आपले हप्ते थकीत होतात. सातत्याने हफ्ते थकीत व्हायला लागल्यामुळे बँक व इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी पावले उचलायला सुरुवात होते व त्यातील पहिला टप्पा येतो तो म्हणजे रिकवरी एजंटचा होय.

कर्ज वसुलीसाठी रिकवरी एजंट आपल्या घरी येतात व कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, रिकवरी एजंट्स नियमाच्या बाहेर जाऊन ग्राहकांना कर्ज वसुलीसाठी त्रास देतात व अशा प्रकारांमुळे काही ग्राहकांनी रिकव्हरी  एजंटच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या देखील केल्याचे आपल्याला दिसून आले आहे.

परंतु जर आपण याबाबत आरबीआयची गाईडलाईन्स बघितली तर रिकवरी एजंट कर्जवसुलीसाठी ग्राहकांना मानसिक त्रास देऊ शकत नाहीत किंवा शिवीगाळ किंवा धमक्या देऊ शकत नाही. त्यामुळे या लेखात आपण रिकवरी एजंट जर त्रास देत असेल तर याबाबत तुमचे काय अधिकार आहेत किंवा आरबीआयचे कोणते नियम आहेत याबद्दलची महत्त्वाची माहिती घेऊ.

 रिकवरी एजंट अशा गोष्टी करू शकत नाही

1- कर्ज वसुलीसाठी रिकवरी एजंट वारंवार फोनवर धमकी देत असेल, शिवीगाळ करत असेल किंवा नको ते मेसेज पाठवत असेल किंवा नको ते शब्द बोलताना वापरत असेल तर ही कृती छळ मानली जाते.

2- एजंट तुमच्या ऑफिस पर्यंत किंवा तुमच्या बॉस पर्यंत जात असेल

3-तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा तुमच्या सोबत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्रास देत असेल

4- तसेच काही कायदेशीर कारवाईची व अटकेची धमकी देत असेल

5- घरी किंवा ऑफिसमध्ये येऊन इतरांसमोर धमकी देत असेल किंवा अपमान करत असेल

6- सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत असेल

7- तुमचा पाठलाग करत असेल किंवा इतरांची मदत घेऊन तुम्हाला त्रास देत असेल

या व इतर कृती रिकव्हरी एजंट करू शकत नाही.

 रिकव्हरी एजंटकरिता रिझर्व बँकेचे काय आहेत निर्देश?

1- सर्वात आधी बँकांनी रिकवरी एजंटची नेमणूक करताना त्याची योग्य तपासणी म्हणजेच व्हेरिफिकेशन करून नंतर नेमणूक  करावी.

2- तसेच बँकांनी रिकवरी एजंट आणि तो कोणत्या एजन्सीचा आहे त्याबद्दलची माहिती ग्राहकांना द्यावी.

3- बँकेने रिकवरी एजंटला दिलेली नोटीस आणि ऑथरायझेशन लेटरमध्ये संबंधित रिकव्हरी एजंटचे नंबर असले पाहिजेत आणि ग्राहकांशी कॉल वर जे बोलण होते ते रेकॉर्ड केलं पाहिजे.

4- ग्राहकांची जर रिकवरी प्रक्रियेबद्दल तक्रार असेल तर ती सोडवण्यासाठी बँकेने व्यासपीठ निर्माण करून द्यावी व ते असणे गरजेचे आहे.

5- जेव्हा रीकव्हरी एजंट ग्राहकांना भेटेल तेव्हा त्याने त्याचे ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे. समजा रिकवरी एजंटने आयडी कार्ड म्हणजेच ओळखपत्र दाखवले नाही तर ग्राहक त्याबाबत तक्रार करू शकतात.

6- गैरवर्तन करू शकत नाही किंवा तुमचा कोणासमोर अपमान देखील करू शकत नाही. धमकी किंवा शिवीगाळ करणे तर लांबचेच आहे.

7- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्ज वसुलीसाठी रिकवरी एजंट तुम्हाला सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेसच कॉल करू शकतात.

 रिकवरी एजंट त्रास देत असेल तर तुमचे काय आहेत अधिकार ?

1- रिकवरी एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार नोंदवू शकतात. पोलिसांनी तुमची तक्रार दाखल करून घेतली नाही तर तुम्ही थेट मॅजेस्ट्रेटकडे देखील जाऊ शकतात.

2- अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला पोलिसांकडून मदत मिळाली नाही तर तुम्ही सिविल कोर्टात जाऊ शकतात. त्यामध्ये कोर्ट रिकवरी एजंटला थांबवू शकते किंवा दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर उपाय सुचवू शकते.

3- याबाबतची तक्रार तुम्ही रिझर्व बँकेत देखील करू शकतात व बँक अशा रिकवरी एजंटवर बंदी घालू शकते.

4- एजंट कडून तुमच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होत असेल तर तशी तक्रार तुम्ही बँकेकडे करू शकता किंवा तुम्ही मानहानीचा खटला देखील दाखल करू शकता.

Ajay Patil