सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिटकडे पाहिले जाते. गुंतवणूक सुरक्षित आणि गुंतवणुकीतून मिळणारा परतावा निश्चित असल्यामुळे कोणत्याही गुंतवणूकदाराकडून प्रामुख्याने मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजनांना प्राधान्य दिले जाते.
यामध्ये बँक आणि पोस्ट ऑफिसच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मुदत ठेव योजना आहेत त्यांच्या माध्यमातून एफडी करण्याकडे आपल्याला बऱ्याच जणांचा कल दिसून येतो. परंतु एफडी करण्या अगोदर बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की नेमकी बँकेत एफडी केल्यावर परतावा चांगला मिळेल की पोस्ट ऑफिस मध्ये?
कारण या दोन्ही ठिकाणी असलेल्या मुदत ठेव योजनेचे वैशिष्ट्ये आणि व्याजदर वेगवेगळे असल्यामुळे आजकाल त्या ठिकाणाहून मिळणारा परतावा देखील हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. याच दृष्टिकोनातून आपण याबद्दलची माहिती बघणार आहोत.
बँकेत पाच वर्षासाठी दोन लाख रुपयांची एफडी केल्यावर किती होईल फायदा?
समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पाच वर्षाकरिता दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला स्टेट बँकेच्या माध्यमातून 6.75 टक्के दराने व्याज मिळते व हे व्याज दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांनी 79 हजार पाचशे रुपये मिळेल व मुदत ठेव योजनेच्या मॅच्युरिटी नंतर तुम्हाला एकूण मुद्दल व व्याज पकडून 2 लाख 79 हजार पाचशे रुपये मिळतील.
तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जर पाच वर्षाच्या कालावधी करिता दोन लाख रुपये जमा केले तर त्यांना पाच वर्षापर्यंतच्या एफडीवर स्टेट बँकेकडून 7.25 टक्के दराने व्याज दिले जाते. अशावेळी जेष्ठ नागरिकांना पाच वर्षात व्याजापोटी 86 हजार 452 रुपये मिळतील व मुदत ठेव योजनेची मुदत संपल्यानंतर दोन लाख 86 हजार 452 रुपयांचा फायदा होईल.
पोस्ट ऑफिसमध्ये किती मिळेल पैसा?
या व्यतिरिक्त तुम्ही जर पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव म्हणजे एफडी केली तर सध्या यावर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात असून पोस्टमध्ये तुम्ही पाच वर्षाकरिता दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर निव्वळ व्याजापोटी 89990 रुपये मिळतील. अशाप्रकारे योजना परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाख 89 हजार 990 रुपये मिळतील. यावरून आपल्याला दिसून येते की बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षाच्या एफडीवर जास्त नफा मिळतो.
पोस्ट ऑफिसचे
सध्या एफडी व्याजदर किती आहेत?1- एक वर्षाची एफडी केली तर सहा टक्के
2- दोन वर्षाची एफडी केली तर सात टक्के
3- तीन वर्षाची एफडी केली तर 7.10%
4- पाच वर्षाची एफडी केली तर 7.50% इतका व्याजदर पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनांच्या माध्यमातून दिला जात आहे.