स्पेशल

मुदत ठेवीमधील गुंतवणूक फायद्याची की तोट्याची? मुदत ठेवीमधील गुंतवणूक का टाळावी? वाचा ही कारणे

Published by
Ajay Patil

भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या अनुषंगाने गुंतवणुकीला फार महत्त्व असते व त्यामुळे बरेचजण वेगवेगळ्या अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक पर्याय निवडला जातो.

या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर यामध्ये मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले जाते. याशिवाय म्युच्युअल फंड तसेच रिअल इस्टेट, शेअर मार्केट व सोन्यासारख्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते.

परंतु या सगळ्यांमध्ये गुंतवणुकी करिता सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य गुंतवणूकदार मुदत ठेवींना जास्त पसंती देतात. आपल्याला माहित आहे की पोस्ट ऑफिस ते बँक यांच्या विविध मुदत ठेव योजना असून गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक पर्याय उपलब्ध करून दिला जातो.

गुंतवणुकीचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुदत ठेवींमधील गुंतवणूक फायद्याची असते. परंतु या गुंतवणुकीच्या काही तोटे देखील आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतील तर त्या अगोदर मुदत ठेवींच्या माध्यमातून होणारे काही तोटे आपण माहीत करून घेणे गरजेचे आहे.

 मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्याने होऊ शकतात हे तोटे

1- मिळतो कमी व्याजदर तुम्हाला जर मुदत ठेवीमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर त्याचा सर्वात मोठा तोटा असतो तो म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीवर मिळणारा कमी व्याजदर हा होय. मुदत ठेवींवर बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये जास्तीत जास्त पाच ते आठ टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जातो.

परंतु हे गुंतवणूक जर तुम्ही इतर ठिकाणी केली तर तुम्हाला जास्त व्याजदर म्हणून परतावा देखील जास्त मिळू शकतो. आपल्याला माहित आहे की म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट मधील गुंतवणूक वर्षाला दहा ते बारा टक्के परतावा देऊ शकते. परंतु मुदत ठेवीमधील गुंतवणूक केली तर महागाई वाढत असताना देखील व्याजदर मात्र समानच राहतो.

2- निश्चित कालावधी आपल्याला माहित आहे की, फिक्स्ड डीपॉझिट म्हणजेच मुदत ठेवींचा एक निश्चित कालावधी असतो व तुम्हाला या कालावधीत बँकेत सहा महिने, एक वर्ष किंवा पाच वर्षे अशा कालावधीसाठी पैसे गुंतवावे लागतात.

परंतु पैसे गुंतवल्यानंतर जर काही कारणामुळे तुम्हाला पटकन पैसे काढण्याची गरज भासली तर ते काढता येत नाहीत. अशावेळी तुम्ही समस्येत येऊ शकतात.

तुम्हाला पैशांची गरज भासली व बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होण्याआधी तुम्ही जर एफडी मोडली तर परतावा तर सोडाच परंतु तुम्हाला उलट काही शुल्क भरावे लागते.

3- संपत्ती वाढवण्याचा हा पर्याय योग्य नाही आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा संपत्तीत वाढ व्हावी हा त्यामागचा एक प्रमुख उद्दिष्ट असते व गरजेवेळी आपल्याला मदत व्हावी हा देखील प्रमुख हेतू असतो. परंतु मुदत ठेवी मधील गुंतवणूक हा संपत्ती वाढवण्याचा योग्य मार्ग नाही.

आता मुदत ठेवीमध्ये पैशांची सुरक्षितरीत्या बचत होऊ शकते हाच उद्देश तुमचा असेल तर मात्र तुम्ही मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. परंतु तुमच्या संपत्तीत किंवा पैशात वाढ करण्यासाठी गुंतवणूक करत असाल तर मुदत ठेवींच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमी व्याजदरामुळे तुम्ही संपत्तीत वाढ करू शकत नाही.

उलट काही कालावधीकरता तुमचे पैसे अडकून पडतात. तुमची जर जोखीम घ्यायची तयारी असेल तर रिअल इस्टेट किंवा स्टॉकमध्ये पैसे जर गुंतवले तर तुम्ही दुप्पट परतावा मिळवू शकतात व त्यामुळे तुमची संपत्ती देखील वाढ होते.

4- बँक बुडाल्यास पैसे परत मिळण्याची हमी समजा तुम्ही बँकेमध्ये मुदत ठेवीच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे व ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. परंतु एखादी बँक आर्थिक डबघाईला आली किंवा बुडाली तर मात्र यातून पैसे परत मिळण्याची जी काही हमी असते ती खूपच कमी असते.

जर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन नियम पाहिला तर  त्यानुसार बँक बुडाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे बँक बंद झाल्यास खातेदाराला केवळ पाच लाख रुपये पर्यंतची रक्कम परत मिळू शकते.

 मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करावी की नाही?

तुम्हाला जर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असेल तर तुम्ही मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. जास्त करून मुदत ठेवीमधील गुंतवणुकीतून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता ही कमीत कमी असते व या योजनांमधून ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदराचा फायदा दिला जातो.

परंतु संपत्ती वाढवण्याचा दृष्टिकोनातून तुम्ही गुंतवणूक करत असाल तर मात्र मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक हा योग्य मार्ग नाही. या व्यतिरिक्त तुम्ही सोने तसेच स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स किंवा बॉण्ड्स अशा गुंतवणूक पर्यायांचा विचार करून संपत्तीत वाढ करू शकतात.

Ajay Patil