स्पेशल

Snake Bite: पावसाळ्यामध्ये वाढतात सर्पदंशाच्या घटना! साप चावला तर आधी काय करावे आणि काय करू नये? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Snake Bite:- जेव्हा पावसाचा कालावधी असतो तेव्हा पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते व अशा पाणी साचल्यामुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे उंदीर किंवा घुस तसेच साप इत्यादी प्राण्यांची बिळे पावसात बुजली जातात व प्राण्यांचा निवारा नष्ट होतो. त्यामुळे अशा प्रसंगी साप किंवा इतर तत्सम जीव हे निवाऱ्यासाठी अडगळीडीची जागा किंवा कधीकधी घरात देखील शिरतात.

अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या वेळेस साप घरात शिरला किंवा घराच्या अवतीभवती असणाऱ्या अडगळी मध्ये असला व चुकून आपला धक्का किंवा पाय त्याच्यावर पडला तर सर्पदंश होऊ शकतो. त्यामुळे या कालावधीत सावधानता बाळगणे खूप गरजेचे असते. त्यातल्या त्यात जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर मात्र ज्याला साप चावला आहे ते व्यक्ती तर प्रचंड घाबरते.

परंतु इतर व्यक्ती देखील प्रचंड प्रमाणात घाबरतात व अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही आणि नको त्या उपाययोजना करणे सुरू होते. आपण ज्या दृष्टिकोनातून पाहिले तर भारतात फुरसे, घोणस तसेच इंडियन कोब्रा आणि मन्यार या प्रजाती सर्वात विषारी मानल्या जातात व बऱ्याच सर्पदंशाच्या घटनांमागे याच जातीचे साप असतात. परंतु यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला सापाने चावा घेतल्या तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते व काही गोष्टी टाळणे देखील महत्त्वाचे असते.

 विषारी साप चावला हे कसं ओळखाल?

बऱ्याचदा साप चावल्याने व्यक्ती भीतीनेच घाबरून त्याचे हार्ट फेल होऊ शकते व त्याचा मृत्यू होतो. काही व्यक्ती भीतीने  बेशुद्ध देखील पडतात. परंतु चावलेला साप हा नेमका विषारी आहे की नाही हे ओळखणे देखील आपल्याला तितकेच गरजेचे असते. याबाबतीत तज्ञ म्हणतात की सर्प दंशाच्या ठिकाणी जर दोन दातांची खूण दिसली तर समजा की चावलेला साप हा विषारी आहे. परंतु जर कुठल्याही प्रकारचे चिन्ह दिसत नसेल तर विषारी साप चावला नसण्याची शक्यता जास्त असते.

 साप चावल्यास आधी हे काम करा

1- एखाद्या व्यक्तीला साप चावला तर सगळ्यात आधी त्याला एखाद्या आरामदायी किंवा आरामशीर जागी झोपायला लावावे.

2- त्या व्यक्तीच्या हातात घड्याळ, अंगठी किंवा बांगडी इत्यादी घट्ट वस्तू असेल तर ती ताबडतोब काढावी व घट्ट कपडे काढून टाकावे.

3- ज्या ठिकाणी सापाने चावा घेतलेला आहे ती जागा हलक्या कपड्याने झाकून टाकावे.

4- ज्याला साप चावला आहे त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का बसणार नाही.

5- वेळ वाया न घालवता जितके लवकरात लवकर शक्य होईल तितके जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन अँटीव्हेनम इंजेक्शन मिळवून ते त्याला देण्याचा प्रयत्न करावा.

 साप चावल्यावर या गोष्टी अजिबात करू नका

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी सापाने चावा घेतला असेल त्या जागी घट्ट कपडा वगैरे काहीही बांधू नका.

2- अशाप्रसंगी चहा किंवा कॉफी सारख्या गोष्टी टाळा. कारण या गोष्टी घेतल्यामुळे सापाचे विष शरीरात वेगात पसरण्यास मदत मिळते.

3- ज्या ठिकाणी सापाने चावा घेतला आहे अशा जागेवर कोणत्याही प्रकारचे थंड किंवा गरम काही लावून शेकवण्याचा प्रयत्न करू नका.

4- सापाने चावा घेतलेल्या जागेला हाताने दाबण्याचा प्रयत्न करू नका.

5- आपल्याला माहित आहे की बऱ्याच घटनांमध्ये ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या ठिकाणी कापले जाते व सापाचे विष काढण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु हे जीवावर देखील बेतू शकते.त्यामुळे अशी गोष्ट टाळा.

6- तसेच विष तोंडाने ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील अजिबात करू नका.

Ajay Patil