स्पेशल

मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाकडून या महिन्यामध्ये निघणार तब्बल ‘इतक्या’ घरांसाठी सोडत

Published by
Ajay Patil

मुंबई आणि पुणे तसेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये आपले स्वतःचे घर असावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यातल्या त्यात मुंबई सारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असणे म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट समजली जाते. परंतु यामध्ये जर आपण मुंबई शहराचा विचार केला तर जागांचे आणि घरांच्या किमती या ठिकाणी गगनाला पोहोचलेल्या आहेत व त्यामुळे मुंबई सारख्या शहरात घर खरेदी करणे हे जवळजवळ मध्यमवर्गीयांच्या आर्थिक आवाक्या बाहेर गेलेले आहे.

परंतु अशा परिस्थितीत देखील मुंबईमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून बऱ्याच प्रकारची मदत केली जाते. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून ज्या काही सोडत काढल्या जातात त्याची सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आतुरतेने वाट पाहिली जाते.

यामागील प्रमुख कारण म्हणजे म्हाडाच्या माध्यमातून मोक्याच्या जागी आणि स्वस्त दरामध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे तुमची देखील अशीच मुंबईमध्ये घर घ्यायची इच्छा असेल तर म्हाडाच्या माध्यमातून जवळपास 1900 घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

 म्हाडा मुंबई मंडळाकडून निघणार 1900 घरांची लॉटरी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून जुलै महिन्यामध्ये तब्बल १९०० घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये यासाठीची लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे जे नागरिक म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून साधारणपणे 4000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती व याकरिता तब्बल सव्वा लाख अर्ज मिळाले होते.

तेव्हा ही घरे गोरेगाव तसेच विक्रोळी येथे होती व या घरासाठी लॉटरी प्रामुख्याने काढण्यात आली होती. त्यानंतर मात्र सर्वांना प्रतीक्षा होती की आता पुढची लॉटरी म्हाडाच्या माध्यमातून कधी प्रसिद्ध होईल. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मंडळाच्या माध्यमातून १९०० घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ही घरे नेमके कोणत्या ठिकाणी असणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील ही घरे सर्व उत्पन्न गटांसाठी खुली असणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती समोर आली आहे.

तसेच यामध्ये गोरेगाव प्रेमनगर येथे हाय-फाय सुविधा असलेल्या 322 घरांची उभारणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जवळपास 800 ते 1000 चौरस फुटांचे फ्लॅट बांधण्यात आले असून यांचा देखील समावेश या येऊ घातलेल्या ऑगस्टमधील म्हाडाच्या सोडतीत केला जाईल अशी शक्यता आहे.

Ajay Patil