स्पेशल

Rent Agreement: घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये 11 महिन्यांसाठीच का केला जातो भाडे करार? आहे का माहिती यामागील कारण?

Published by
Ajay Patil

Rent Agreement:- जेव्हा कोणतीही व्यक्ती अगदी सुरुवातीला शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जाते तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्याला राहण्याची सोय करणे खूप गरजेचे असते. यामुळे आपण एखादे घर भाड्याने शोधतो व त्या घरामध्ये राहायला लागतो.

पण जेव्हा पण एखाद्या भाड्याच्या घरात राहायला लागतो तेव्हा त्या घराचा मालक आपल्या सोबत म्हणजेच भाडेकरू सोबत भाडे करार करत असतो. या करारामध्ये भाडेकरू आणि घरमालक यांच्यात ठरलेल्या महत्त्वाच्या अनेक गोष्टींची माहिती नमूद केलेली असते.

परंतु हा भाडेकरार फक्त 11 महिन्यांसाठीच केला जातो. पण आपण कधी विचार केला आहे का हा भाडेकरार करताना तो अकरा महिन्यांसाठीच का केला जातो? त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी का केला जात नाही? या विषयाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 भाडेकरार 11 महिन्यांसाठीच का केला जातो?

भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये जो काही भाडेकरार केला जातो तो फक्त 11 महिन्यांसाठीच केला जातो.या मागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे नोंदणी कायदा 1908 च्या कलम 17 मधील अटीनुसार जर बघितले तर एक वर्षापेक्षा कमी कालावधी करिता करार असल्यास लीज कराराची नोंदणी करणे बंधनकारक नसते.

म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे बारा महिन्यापेक्षा कमी कालावधीचा भाडेकरार हा नोंदणी शिवाय केला जातो व यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांना सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन कागदपत्रांची नोंदणी करणे आणि त्यासाठीचे आवश्यक शुल्क भरणे इत्यादी पासून वाचता येते अर्थात या सगळ्या प्रक्रियेपासून सूट मिळते.

भाडेकरार जर बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा असेल तर त्याकरिता नोंदणी करावी लागत नाही व साहजिकच मुद्रांक शुल्कामध्ये बचत होते. जे शुल्क भाडेकरार नोंदणी करताना भरावे लागू शकते. हेच मुद्रांक शुल्क टाळण्याकरिता भाडेकरू आणि घरमालक सामान्यतः परस्पर संमतीने लीजची नोंदणी न करण्याचा निर्णय घेतात

व नोंदणी सारख्या इतर कायदेशीर प्रक्रियेमध्ये होणारा त्रास आणि मुद्रांक शुल्क सारखा लागणारा खर्च टाळण्याकरिताच भाडेकरार हा 11 महिन्यांचा केला जातो. समजा भाडेकराराची नोंदणी केली तर भाड्याची रक्कम आणि कराराचा कालावधीच्या आधारावर मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे असते.

या प्रक्रियेमध्ये जितका जास्त कालावधीचा भाडेकरार असेल तितकं जास्त मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे असते. परंतु 11 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी करार करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे जास्तीचे पैसे भरावे लागत नाही व त्याकरिता भाडेकरार हा प्रामुख्याने अकरा महिन्याचा केला जातो.

 भाडे करारात कोणत्या गोष्टींचा असतो उल्लेख?

घरमालक व भाडेकरू यांच्यामध्ये जो काही भाडे करार केला जातो त्यामध्ये भाडेकरू आणि घरमालकाचे नाव आणि दोघांचे पत्ते, भाड्याची ठरलेली रक्कम तसेच राहण्याचा कालावधी व इतर अनेक अटी व नियम यामध्ये नमूद केलेल्या असतात.

Ajay Patil