स्पेशल

संगमनेर तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने यशस्वी केली इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची लागवड! वाचा कसे केले लागवड नियोजन?

Published by
Ajay Patil

Kesar Mango Cultivation:- शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठल्याही भागामध्ये कोणत्याही पिकाची लागवड शक्य झालेली आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर सफरचंद जर म्हटले तर ते फक्त हिमाचल आणि जम्मू काश्मीर सारख्या थंड हवामान असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकते.

परंतु आता महाराष्ट्र सारख्या उष्ण प्रदेशामध्ये देखील शेतकऱ्यांनी सफरचंदाची बागा यशस्वी केल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी त्याच पद्धतीने जर आपण केशर आंब्याचा विचार केला तर हे पीक प्रामुख्याने कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर येते. मुळात म्हणजे आंब्याच्या सगळ्या जातींची लागवड कोकणामध्ये केली जाते व त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील मिळते.

परंतु याच कोकणातील केशर आंब्याची लागवड चक्क अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या वडगाव लांडगा या गावच्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आणि इंजिनीयर असलेल्या त्यांच्या मुलाने यशस्वी करून दाखवली आहे व तीही इस्राइल पद्धतीने.

संगमनेर तालुक्यातील रिटायर्ड पोलीस निरीक्षकाने फुलवली केशर आंब्याची बाग

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्या नगर जिल्ह्यात असलेल्या संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा या गावचे प्रगतिशील शेतकरी आणि रिटायर्ड पोलीस निरीक्षक दिलीप दत्तात्रय लांडगे व त्यांचा इंजिनीयर असलेला मुलगा अजय लांडगे या दोघा पिता-पुत्रांच्या जोडीने चक्क इस्रायल पद्धतीने केशर आंब्याची लागवड यशस्वी केलेली आहे.

प्रयोगाखातर त्यांनी बारा गुंठा जागेमध्ये 100 झाडे लावली असून त्यांच्या या पडीक जमिनीवरील आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येणाऱ्या पुढच्या वर्षी या केशर आंब्यापासून उत्पादन त्यांना मिळायला सुरुवात होईल.

दिलीप लांडगे शेतीकडे कसे वळलेत?
दिलीप लांडगे यांनी त्यांच्या नोकरीच्या कालावधीमध्ये नागपूर, मुंबई तसेच ठाणे व नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये सेवा बजावली. परंतु सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शहरात न राहता कुटुंबासोबत गावी येऊन राहण्याचे ठरवले व त्यानुसार ते त्यांच्या गावी संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा या ठिकाणी आले.

गावी येऊन काय करायचे? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर आपण शेती करायची असे त्यांनी ठरवले. परंतु सध्याची शेतीची जर परिस्थिती पाहिली तर ती जरा बिकट असल्याचे त्यांना माहिती होते. कारण शेतीमालाला भाव नाही.तसेच अवकाळी पाऊस इत्यादीमुळे पिकांचे खूप मोठे नुकसान होते.

त्यामुळे परंपरागत पद्धतीने शेती न करता काहीतरी वेगळे करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही पिता-पुत्रांनी प्रयत्न सुरू केले. या सगळ्या गोष्टींमध्ये माहिती मिळवत असतानाच अजय यांना इस्त्रायल पद्धतीने केशर आंब्याची लागवडीबाबत इंटरनेटच्या मदतीने माहिती मिळाली व केशर आंबा लागवड करण्याचे त्यांनी ठरवले.

यामध्ये जर आपण पारंपारिक पद्धतीने नुसार आंब्याची लागवड केली तर एका एकरमध्ये खूप कमी प्रमाणात आंब्याच्या रोपांची लागवड करणे शक्य होते. परंतु तीच लागवड जर इस्राईल पद्धतीने केली तर एका एकरमध्ये जास्तीत जास्त झाडे लावता येतात.

त्यामुळे इस्रायल पद्धतीने लागवड करण्याचे त्यांनी निश्चित केले व या कामी त्यांनी तज्ञांचा सल्ला देखील घेतला. माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून घेतल्यानंतर त्यांनी केशर आंब्याच्या रोपांची लागवड केली.

अशा पद्धतीने केली त्यांनी रोपांची लागवड
पडीक जमिनीवर इस्रायल पद्धतीने केशर आंब्याच्या रोपांची लागवड करण्यासाठी त्यांनी दोन झाडांमधील अंतर तीन- चार फूट तर लांबीचे अंतर बारा फूट इतके ठेवले. या पद्धतीला क्लोज प्लांटेशन असे म्हटले जाते. ही आंबा लागवडीची पद्धत आहे एक आधुनिक अशी पद्धत आहे.

रोपांची लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. साधारणपणे या रोपांच्या लागवडीला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही रोपे जळाली व पुन्हा नवीन रोपे त्या ठिकाणी त्यांनी लावली.

त्यानंतर मात्र लावलेली सर्वच रोपे जगवण्यामध्ये ते यशस्वी झाले व आता रोपांचे रूपांतर झाडांमध्ये झाले असून पुढच्या वर्षी त्यांना त्यापासून आंब्याचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे वर्षातून एकदा आंब्याच्या झाडांची छाटणी देखील केली जाते व पाणी देताना मात्र नियोजन व्यवस्थित करावे लागते.

Ajay Patil