स्पेशल

Big Breaking : विखे पाटलांना मंत्रालयात कोण भेटलं ? रोहित पवारांनी केला धक्कादायक खुलासा

Rohit Pawar News : गेल्या बुधवारी मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी कार दाखल झाली होती, त्यात कोणता मोठा प्रस्थ होता हे तर त्या गाडीला असणाऱ्या काळ्या काचांमुळे उघड होऊ शकले नाही पण या महागड्या गाडीचा थाट पाहता ही गाडी खास व्यक्तीची होती एवढे नक्की. कारण ही गाडी मंत्रालयात विना चेकिंग दाखल झाली अन महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी मंत्र्यांच्या गाड्या उभ्या राहतात, मंत्र्यांचा संपूर्ण ताफा असतो त्याच ठिकाणी ही गाडी पार्क झाली.

यामुळे मंत्रालयात दाखल झालेल्या या मिस्ट्री कारची चर्चा होणे साहजिकच होते. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या लेम्बोर्गिनी गाडीची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी या कारमधून कोणीतरी खास व्यक्ती आला होता असा दावा करण्यात आलाय खरा. पण या आलिशान गाडी मधून आलेली व्यक्ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच भेटायला आली होती याची पुष्टी काही होऊ शकली नाही.

मात्र, मंत्रालयात आलेल्या या लेम्बोर्गिनी कारवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायला तासंतास वाट बघावी लागते. मात्र या कारची चेकिंग न करताच मंत्रालयात एन्ट्री देण्यात आली. ही आलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो, त्याच ठिकाणी थांबली होती. म्हणून विरोधकांनी लॅम्बोर्गिनी कार वरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार सुद्धा लॅम्बोर्गिनी गाडीवरून आता आक्रमक झाले आहेत.

रोहित पवारांनी 10 तारखेला सोशल मिडियावरती एक पोस्ट लिहून मंत्रालयात काळ्या रंगाची एक महागडी गाडी आली, ही महागडी गाडी कुणाची? कुणाला भेटायला आले? कोणत्या कामासाठी भेटायला आले? याचा लवकरच खुलासा करणार असे म्हटले होते. दरम्यान आज रोहित पवारांनी आपल्या अधिकृत फेसबुक हँडल वर एक पोस्ट लिहून या लेम्बोर्गिनी कारच्या संदर्भात काही दावे केले आहेत. तसेच #वाचा_आणि_थंड_बसा, #आर्थिक_घोटाळा, #सत्तेचा_दुरुपयोग असे काही हॅशटॅग देखील त्यांनी या पोस्टमध्ये वापरले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय ?

व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील काळी गाडी. या काळ्या गाडीच्या मालकाचे नाव आहे कुमार मोरदानी. या व्यक्तीविषयी कुठ्लाही राजकारणी किंवा अधिकारी बोलणार नाही, मिडिया देखील बोलणार नाही कारण हा व्यक्ती सर्वांची काळजी घेतो. या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे ५० हून अधिक कंपन्या ministry of corporate affairs कडे नोंद असून या महागड्या व्यक्तीने अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. त्यामध्ये ग्राहकांनी ज्या प्रकल्पासाठी १९ कोटी दिले, बँकांनी ज्या प्रकल्पासाठी २०२ कोटीचे कर्ज दिले ते पैसे त्या प्रकल्पासाठी न वापरता २२१ कोटीपैकी १९६ कोटी दुसरीकडेच वळवले, शिवाय प्रकल्पाला ६ मजल्यांची परवानगी असताना १३ मजले बांधले आणि रेरा कायद्याचंही उल्लंघन केलं.

एका दुसऱ्या प्रकरणात तर SRA कायद्याअंतर्गत वाढीव FSI घेतला परंतु SRA ची कामे न करता शासनाची फसवणूक केली. त्यासंदर्भात तर २०१७ मध्ये तत्कालीन विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला. शासनानेही फसवणूक झाल्याचे मान्य केले, ज्या सदस्यांनी हा मुद्दा मांडला त्यापैकी ना. धनंजय मुंडे साहेब आणि ना. नितेश जी राणे हे सदस्य सध्या मंत्रिमंडळात आहेत.

ही महागडी गाडी मंत्रालयात आली तर मंत्रालयात त्यांचं कामही तेवढंच महागडं असेल. पनवेल येथे रोडलगत ११६ एकर जमीन जी जमीन पूर्वी शासनाची भोगवटा – वर्ग २ मध्ये होती, त्यासंदर्भातली फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पनवेलमध्ये ११६ एकर रोडलगत जमीन म्हणजे ७०० कोटीहून अधिकच महागडा विषय आहे आणि देवाणघेवाणही महागच असेल, यात कुठलीही शंका नाही .

एरवी सर्वसामान्य जनतेची नाकाबंदी करणाऱ्या मंत्रालयीन व्यवस्थेने या महागड्या गाडीला विशेषतः ज्या गाडीचा मालक शासनाची फसवणूक करण्याच्या अनेक गुन्ह्यात गुन्हेगार आहे अशा गुन्हेगाराला सर्व नियम धाब्यावर बसवून कुठलीही चौकशी न करता थेट आत सोडलेच कसे? हा प्रश्न आहे, पण ही गाडी सोडण्यासाठी एका उपमुख्यमंत्री कार्यालातून फोन आल्याचे सांगितले जात आहे.

बीड-परभणी घटनेत आरोपी कोण? आरोपीच्या जवळचे कोण? तपास कसा होतोय? हे राज्यातल्या शेंबड्या पोरालाही माहित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही माहित आहे. छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारा आपटे जसा काल परव्याअभावी सुटला तसेच बीड-परभणी घटनेतील आरोपी देखील सुटतील. दोषींवर कारवाई होणार नाही हिच भीती अधिक आहे. कारण आरोपी धनदांडगे आहेत तर पिडीत सर्वसामान्य आहेत. मंत्रालयातल्या महागड्या गाडी प्रकरणातही ती व्यक्ती कोणत्या कामासाठी आली? कुणाला भेटली? हे सर्वांनाच माहित आहे पण कुणी बोलणार नाही कारण ती व्यक्ती धनदांडगी आणि सत्तेशी संबंधीत आहे.

एकीकडे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत पण त्यांची दखल शासन घेत नाही, परंतु दुसरीकडे महागड्या गाडीच्या महागड्या मालकाचे बेकायदेशीर काम करून देण्यासाठी मंत्रालयात पायघड्या अंथरल्या जातात, हे आपल्या कायदा सुव्यवस्थेचं भीषण वास्तव आहे.
#वाचा_आणि_थंड_बसा |
#आर्थिक_घोटाळा | #सत्तेचा_दुरुपयोग |

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Recent Posts