Sangamner News : महाराष्ट्राच्या राजकारणात शिर्डी आणि संगमनेर हे दोन महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास आलेली आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदार संघाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
थोरात हे संगमनेर मधून गेली आठ टर्म विजयी झाले असून त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे. मात्र, यावेळी थोरात यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र नगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आव्हान देणार असे बोलले जात होते.
जर सुजय विखे पाटील हे संगमनेर मधून निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर संगमनेरची यंदाची निवडणूक ही खूपच लक्षवेधी ठरणारी होती. पण ऐनवेळी महायुतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली आणि येथून शिवसेनेने अमोल खताळ यांना उमेदवारी दिलेली आहे.
दरम्यान खताळ यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. खरे तर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आग्रही होते. विखे पिता-पुत्र या जागेसाठी आग्रही तर होतेच शिवाय त्यांनी संगमनेरात अनेक दिवस तळ ठोकला होता.
यामुळे ही जागा महायुतीकडून शिवसेनेला सुटल्यानंतर विखे पिता पुत्र काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान आता खताळ यांच्या उमेदवारीवरून राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महायुतीची उमेदवारी डॉ. सुजय विखे यांना मिळाली नसली तरी महायुतीचा धर्म आपण सर्वांनी पाळून अमोल खताळ यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अमोल खताळ हेच माझ्यासाठी डॉ. सुजय विखे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
यावेळी मंत्री विखे म्हणालेत की, धांदरफळ या ठिकाणी सभा झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या गाड्या फोडल्या जाळल्या, महिलांना मारहाण केली. त्याबद्दल साधी माफी सुद्धा मागण्याची दानत आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये नव्हती.
त्यामुळे धनशक्ती विरोधात लोकशक्ती अशी ही निवडणूक असून यामध्ये लोकशक्तीचा विजय होईल. आता येथील दहशतवाद आम्ही संपून टाकू, अमोल खताळ हेच माझ्यासाठी डॉक्टर सुजय विखे आहेत.
त्यामुळे महायुतीचे सर्वांनी आता त्यांना पाठिंबा देऊन त्यांचे काम करून त्यांना निवडून आणावे असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.