Sarkari Jamin Mojani : शेतकऱ्यांची खरी ओळख ही शेत जमिनीवरून होत असते. शेतकऱ्यांकडे असलेल्या सातबाऱ्यावर त्यांच्याजवळ किती शेतजमीन आहे याची नोंद असते. पण अनेकदा असं होतं की सातबाऱ्यावर असलेली जमिनीची नोंद आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जमिनीच्या हक्कापोटी वादविवाद देखील होतात.
शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत वाद विवाद होतात आणि अनेकदा प्रकरण हाणामारीच्या घटना पर्यंत जाते. परिणामी शेतकऱ्यांना नाहक कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अटकावे लागते. अशा परिस्थितीत, सातबारावर असलेली जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये जर तफावत असेल तर शेतकऱ्यांना शासकीय जमीन मोजणी करण्याचा सल्ला दिला जातो.
निश्चितच शासकीय जमीन मोजणी शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे मात्र जमीन मोजणी कशी करायची? यासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी नेमकं शुल्क किती आकारला जातो यांसारख्या अनेक बाबी शेतकऱ्यांच्या पुढ्यात असतात. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी या संदर्भातील सर्व आवश्यक बाबी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेत जमीन मोजणी साठी अर्ज कुठे करायचा?
जर समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेत जमिनीच्या हद्दीबाबत काही शंका असेल किंवा सातबाऱ्यावर नमूद करण्यात आलेली जमीन आणि प्रत्यक्ष असलेले जमिनी यामध्ये जर तफावत आढळत असेल. किंवा आपल्या जमिनीवर दुसऱ्या शेतकऱ्याने हक्क दाखवला असेल, बांध कोरला असेल यांसारख्या शँकेच निरसन करायचं असेल तर शेतकरी बांधव शासनाच्या माध्यमातून जमीन मोजणी करू शकतात.
त्यासाठी शेतकऱ्यांना तालुकास्तरावरील भूमी अभिलेख विभागाच्या उपाधीक्षक यांच्याकडे किंवा नगर भूमापन कार्यालयात अर्ज करू शकता. त्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करणे मात्र बंधनकारक राहतं. यासाठीचा विहित नमुना पाहण्यासाठी आम्ही आपणांस पीडीएफ उपलब्ध करून देणार आहोत. ही पीडीएफ आपणांस या लेखाच्या तळाला उपलब्ध होणार आहे तेथून आपण हा अर्ज डाऊनलोड करू शकता.
आता अर्ज कसा भरायचा?
मोजणीसाठी अर्ज प्राप्त केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना हा अर्ज काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना तालुका आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागते. यानंतर अर्जदार शेतकऱ्याचा वैयक्तिक तपशील द्यावा लागतो. यामध्ये अर्जदार शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव यांसारखी माहिती भरावी लागते.
यानंतर जमीन मोजणी संबंधित माहिती शेतकऱ्यांना भरावी लागते. शिवाय जमीन मोजणीचा प्रकार, कालावधी आणि जमीन मोजणीचा उद्देशी देखील नमूद करावा लागतो. यानंतर पुन्हा अर्जदार शेतकऱ्याला आपले नाव तालुका आणि जिल्ह्याचे नाव तसेच शेतकऱ्याच्या जमिनीचा गट क्रमांक देखील लिहावा लागतो. यानंतर जमीन मोजणीसाठी आवश्यक शुल्काबाबत विवरण या ठिकाणी भरावे लागते. जमीन मोजणी फी चलन किंवा पावती क्रमांक नमूद करावा लागतो तसेच दिनांक नमूद करावी लागते.
जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारल जात
हा सर्वात महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांकडून कायम विचारला जाणारा प्रश्न आहे. याचे उत्तर असं की जमीन मोजणीची फी ही जमिनीच्या क्षेत्रावर आणि किती कालावधीमध्ये जमिनीची मोजणी करायची आहे यावर अवलंबून असते.
जमीन मोजणी एकूण तीन प्रकारात होते साधी मोजणी, तातडीची मोजणी आणि अति तातडीची मोजणी अशा तीन प्रकारात याला विभागला गेल आहे. दरम्यान साधी मोजणी ही सहा महिन्यांच्या कालावधीत होते, तातडीची मोजणी ही तीन महिन्यांच्या कालावधीत होते तर अति तातडीची मोजणी ही दोन महिन्याच्या आतच पार पाडली जाते. मात्र या तिन्ही मोजणींसाठी जमिनीनुसार वेगवेगळी फी आकारली जाते.
मग आता या प्रकारानुसार जमीन मोजणीसाठी किती शुल्क लागेल? जर समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्या दोन एकर शेत जमिनीची मोजणी करायची आहे तर अशा शेतकऱ्याला साधी जमीन मोजणी करण्यासाठी म्हणजेच सहा महिन्यांच्या कालावधीत जमीन मोजणी करण्यासाठी दोन हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.
जर समजा या शेतकऱ्याला तातडीची मोजणी म्हणजेच तीन महिन्याच्या कालावधीत मोजणी करायची असेल तर त्याला चार हजार रुपयाची रक्कम द्यावी लागेल.
तसेच जर या शेतकऱ्याला अति तातडीची जमीन मोजणी करायची असेल म्हणजेच दोन महिन्याच्या कालावधीत जमीन मोजणी करायची असेल तर या शेतकऱ्याला 6000 रुपये जमीन मोजणीसाठी शुल्क द्यावा लागेल.
शेतकरी बांधव शुल्काबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तालुकास्तरावरील कार्यालयाला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
अर्ज भरताना खालील बाबी काळजीपूर्वक भरा
सदर जमीन मोजणी अर्जामध्ये संबंधित मोजणीदार शेतकऱ्याला जमीन मोजणीचा उद्देश लिहवा लागतो. यामध्ये शेतकरी बांधव जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याचे किंवा वाद विवाद असल्याने जमीन मोजणी करावयाची आहे असा उद्देश लिहू शकतात. शेतकरी बांधवांनी ज्या उद्देशाने जमीन मोजणी करायची असेल तो उद्देश लिहायचा आहे.
तसेच ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या सातबारा उतारा वर एकापेक्षा अधिक जण वाटेकरी असतील तर या लोकांची देखील संमती लागणार असून समती दर्शवण्याचा स्वाक्षऱ्या या ठिकाणी घ्याव्या लागतील. तसेच या लोकांची नावे आणि पत्ते या ठिकाणी नमूद करावे लागणार आहेत.
यासोबतच अर्जावर ज्या जमिनीची मोजणी करायचीं आहे त्याच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर, दक्षिण या दिशेला असलेल्या शेतकऱ्यांची देखील नावे लिहावे लागतील.
जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
जी जमीन मोजणी करायची आहे त्या जमिनीचा चालू महिन्यातील सातबारा सहित गेल्या दोन महिन्यातील सातबारे उतारे.
तसेच जमिनीचा चतुसीमेचा तलाठ्याकडून मिळवलेला दाखला.
ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे.
मोजणी फी बँकेत भरल्याचे चलन
जमीन मोजणीचा अर्ज.
शासकीय जमीन मोजणीचा अर्ज
शासकीय जमीन मोजणीचा अर्ज पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेण्यासाठी शासकीय जमीन मोजणी अर्ज या लिंक वर क्लिक करा.