स्पेशल

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली, आता वेध मंत्रीपदाचे !

Published by
Tejas B Shelar

Shirdi MLA Radha Krishna Vikhe Patil News : भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. आज सकाळी ठीक 11:00 वाजता त्यांनी शपथ घेतली. ते राज्यातील सर्वात सीनियर आमदारांच्या यादीत येतात.

राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा निवडून आले आहेत. त्यांनी 1995 पासून 6 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली मंत्री म्हणून काम केले आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 12 वेगवेगळी खाती सांभाळली आहेत.

विखे पाटील हे 1995 पासून विधानसभेचे सदस्य आहेत. 1995 मध्ये पहिल्यांदा ते शिवसेनेच्या तिकिटावर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. तेव्हापासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि ते 2019 पर्यंत काँग्रेसमध्ये राहिले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील एक मोठे नेतृत्व आहे. त्यांनी मावळत्या सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यान, नुकत्याच स्थापित झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागणार अशी शक्यता आहे. शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला आहे, किंबहुना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातही विखे पाटील यांचा चांगला दबदबा आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच्या विजयामध्ये मोठी मोलाची भूमिका निभावलीये. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अहिल्यानगर जिल्ह्यात चांगले यश आले आहे.

जिल्ह्यातील 12 पैकी दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दहा पैकी चार उमेदवार भारतीय जनता पक्षाचे, चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि 2 उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीचा आपला बालेकिल्ला शाबूत ठेवत पारनेर, संगमनेर, राहुरी, नेवासा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील रामाभाऊंसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.

पण, कर्जत जामखेडच्या अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांचा विजय झाला. संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामागे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा रोल होता. शिवसेनेचे संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयामागे राधाकृष्ण विखे पाटील यांची रसद होती.

एकूणच काय की, अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या विजयामध्ये सर्वात मोठा रोल हा राधाकृष्ण विखे पाटील यांचाचं राहिलाय. यामुळे भारतीय जनता पक्ष विखे पाटील यांना यावेळी सुद्धा कॅबिनेटमध्ये स्थान देणार आहे. पण त्यांना यावेळी कोणते खाते मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com