धक्कादायक : लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत कोरोनाची दुसरी लाट येतेय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लॉकडाऊनमध्ये सूट देणाऱ्या देशांत आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे दक्षिण कोरियावर २१०० हून अधिक बार व नाईट क्लब बंद करण्याची वेळ आली आहे.

जर्मनीलाही आपले कत्तलखाने बंद करावे लागले आहेत. इटलीतही नागरिकांनी ‘विकेंड’च्या सुट्टीत भाऊगर्दी केल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे.

चीन, दक्षिण कोरिया, इटली आदी अनेक देशांनी लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. पण, आता या देशांत कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

दक्षिण कोरियात मागील २४ तासांत कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळले. यामुळे येथील प्रशासनाने राजधानी सेऊलमधील २१०० हून अधिक बार व नाईट क्लब बंद केले आहेत.

नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे ही वेळ ओढावल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. कोरियात आतापर्यंत १०८७४ रुग्ण आढळले असून, २५६ जणांचा बळी गेला आहे.

चीनमध्येही लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर ३४ नवे रुग्ण आढळले. यातील एक व्यक्ती हुबेई प्रांतातील आहे. या प्रांतात मागील ३५ दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.

पण, आता तिथेही रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे. हुबेईच्या वुहानमध्येच गत डिसेंबरमध्ये कोरोनाचा सर्वप्रथम उद्रेक झाला होता. चीनमध्ये कोरोनाचे ८२९०१ रुग्ण असून, ४६३३ बळी गेले आहेत.

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत मागील २४ तासांत १५०० हून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. येथील काही प्रांतांत लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे, तर काही राज्यांनी यास विरोध केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24