Shrigonda News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते विजयी झालेत. श्रीगोंदा हा पाचपुते यांचा बालेकिल्ला. या मतदार संघाचे बबनदादांनी 35 वर्ष प्रतिनिधित्व केले आहे.
आता त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दरम्यान, श्रीगोंदा तालुक्याला आणखी एक आमदार मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. राहुल जगताप हे विधान परिषदेवर जाऊ शकतात असा दावा प्रसार माध्यमांमध्ये होतोय.
खरंतर राहुल जगताप यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, पाचपुते यांच्या वादळापुढे जगतापांचा निभाव काही लागला नाही. श्रीगोंदा तालुक्यातील युवकांचे धडाडीचे नेतृत्व म्हणून राहुल जगताप यांची ओळख आहे.
मात्र त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. जगताप यांच्या पराभवामुळे तालुक्यातील सहकारी साखर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता पसरली.
सहकारी साखर कारखानदारी अडचणीत येऊन यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते असे बोलले जाऊ लागले होते. यामुळे राहुल जगताप लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जगताप येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर सूत्रांनी अजित पवार गटात जगताप यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांची वर्णी विधान परिषदेवर लागू शकते असा देखील दावा केला आहे.
राहुल जगताप यांची विधान परिषदेवर वर्णी लागली तर साहजिकच श्रीगोंदा तालुक्याला दोन आमदार लाभणार आहेत. विधानसभेत बबन दादा पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते आणि विधान परिषदेत राहुल जगताप असे दोन आमदार श्रीगोंदा तालुक्याला लाभतील.
तथापि अजून जगताप यांनी अजित पवार गटात प्रवेश केलेला नाही. यामुळे, जगताप यांचा पक्षप्रवेश कधी होतो आणि त्यांना खरंच विधान परिषदेवर पाठवले जाते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
तथापि आज जगताप आपल्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून उद्या मुंबईला जाऊन अधिकृतरित्या अजित पवार गटात प्रवेश करतील आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल असे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.