Snake Bite To Animal:- पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सर्पदंशाच्या घटना जास्त प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते. कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा सापांचा निवारा नष्ट झाल्याने ते आडोशासाठी किंवा निवाऱ्यासाठी अगदी घरात देखील येऊ शकतात व रानामध्ये देखील आपल्याला मोकळे गवतामध्ये फिरताना दिसतात.
अशावेळी जर जनावरे चरायला सोडले तर जनावरांना सर्पदंश होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते व त्या दृष्टिकोनातून काळजी घेणे महत्त्वाचे असते. जर आपण सापांचे प्रकार बघितले तर यामध्ये नाग, मन्यार,घोणस तसेच फुरसे या जातीचे साप विषारी असतात.
या प्रत्येक जातीच्या सापाने चावा घेतल्यानंतर लक्षणे देखील वेगवेगळी दिसतात.त्यामुळे आपण या या लेखांमध्ये जनावरांना होणाऱ्या सर्पदंशाबद्दल महत्वाची माहिती घेऊ.
कोणत्या जातीचा साप चावला तर जनावरामध्ये कोणती लक्षणे दिसतात?
1- नाग– हा एक विषारी जातीचा साप असून या सापाने जर चावा घेतला तर याचे विष हे मेंदू व हृदय या अवयवांना इजा करणारे असते. नागाने दंश केला तर बाधित जनावरांमध्ये चावल्याच्या ठिकाणी सुज येते व जनावरांच्या तोंडातून लाळ गळते.
जनावरांमध्ये अर्धांगवायू सदृश्य लक्षणे दिसायला लागतात व जनावरांचा तोल जातो. अशाप्रसंगी जर वेळेवर उपचार मिळाला नाही तर जनावरे श्वसनसंस्थेचा अर्धांगवायू होऊन मृत्यू पावतात.
2- मण्यार– या जातीच्या सापाने जर जनावरांना चावा घेतला तर या सापाचे विष हे प्रामुख्याने मज्जासंस्था आणि रक्ताशी संबंधित जे अवयव आहेत त्यांना इजा पोहोचवते. जर वेळेवर उपचार मिळाला नाही तर श्वसनसंस्थेचा अर्धांगवायू होऊन जनावरे मरतात.
मण्यार जातीचा साप चावला तर चावल्याच्या ठिकाणी मोठी सूज येते.तसेच जनावरांचा श्वसनाचा वेग वाढतो व रक्तस्त्राव व्हायला लागतो. हृदयाची ठोके देखील वाढतात व ताप येतो. जनावरांमध्ये प्रचंड अशक्तपणा येतो व नंतर ते बसून राहतात अशी साधारणपणे लक्षणे दिसायला लागतात.
3- फुरसे आणि घोणस– या दोन्ही प्रजातींच्या सापाचे विष हे रक्त गोठवण्याची प्रक्रिया थांबवणारे तसेच रक्तातील लाल पेशींना इजा करणारे व रक्तस्राव करणारे विषारी घटक असलेले असते.एखाद्या जनावराला जर या प्रजातीचे साप चावले तर चावल्याच्या ठिकाणाहून रक्तस्राव होतो तसेच पायांवर चावा घेतला असेल तर सूज मोठ्या प्रमाणावर वरच्या दिशेने चढत जाते व जनावरांना वेदना होतात.
अस्वस्थ वाटायला लागते तसेच जनावरे चालताना लंगडतात व त्यांचे खाणे पिणे देखील कमी होते किंवा मंदावते.तसेच या जातीच्या सापाने जर तोंडाच्या भागांमध्ये दंश केला असेल तर तोंडावर देखील मोठ्या प्रमाणावर सूज येते व खालच्या बाजूस असेल तर जनावरांना श्वास घ्यायला त्रास होतो व योग्य उपचार नाही मिळाले तर जनावर दगावू शकते.
तसेच सर्पदंशात रक्त गोठवणाऱ्या पेशींची संख्या कमी होते व उपचार वेळेवर मिळाले नाहीत किंवा उशीर झाला तर जनावरांच्या विविध अवयवांमधून रक्तस्राव व्हायला लागतो व त्यामुळे रक्तशय होतो. अशाप्रकारे रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाला तर जनावरे मरतात.