Soybean Farming : सोयाबीन म्हटलं की महाराष्ट्राचं नाव अग्रगण्य सोयाबीन उत्पादक राज्यांच्या यादीत येत. एका आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी मध्य प्रदेश राज्यात 45% इतकं सोयाबीन उत्पादन होतं आणि मध्य प्रदेश इतक्या विक्रमी उत्पादनामुळे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.
मध्यप्रदेश पाठोपाठ आपल्या राज्यात सोयाबीनच सर्वाधिक उत्पादन होतं. राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 40 टक्के सोयाबीनचे उत्पादन घेतलं जातं. राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. या तीन विभागा व्यतिरिक्त खानदेशात देखील सोयाबीन पेरला जातो. याच प्रमाण मात्र त्या ठिकाणी खूपच कमी आहे.
एकंदरीत पाहिलं तर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा मदार हा या पिकावर आहे. अर्थातच नगदी पीक असल्याने अलीकडे याच्या क्षेत्रात अजून वाढ होत आहे. मात्र यंदा सोयाबीनला मिळालेला भाव हा शेतकऱ्यांचे अपेक्षेप्रमाणे नसल्याने कोठे ना कुठे शेतकऱ्यांचा हिरमोड या पिकाच्या बाबतीत झाला आहे. परंतु असे असले तरी शाश्वत उत्पन्न देणार हे पीक शेतकऱ्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिले आहे.
महाराष्ट्रात उत्पादित होणार हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात उत्पादित होतं. मध्यप्रदेश मध्ये देखील खरीप हंगामातच या पिकाचे उत्पादन अधिक आहे. मात्र आता काळाच्या ओघात सोयाबीन लागवडीमध्ये देखील वेगवेगळे प्रयोग शेतकरी करत आहेत. त्याचा प्रयोगाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी कृषी विभागाच्या पुढाकाराने उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरणीचा अभूतपूर्व असा उपक्रम करण्यात आला होता.
हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असला तरी देखील अनेक शेतकऱ्यांना यातून अपेक्षित असे उत्पादन मिळालं नव्हतं. विशेष बाब म्हणजे हा उपक्रम बीजोत्पादनासाठी प्रामुख्याने कृषी विभागाच्या पुढाकाराने राज्यात राबविण्यात आला होता. दरम्यान आता वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने याही पुढे जाऊन सोयाबीन पीक लागवडीत मोठा अभिनव असा उपक्रम केला आहे. वर्धा जिल्ह्यातील महाबळा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने खरीप हंगामात म्हणजे पावसाळ्यात उत्पादित होणार सोयाबीन पीक चक्क हिवाळी आणि उन्हाळी हंगामात देखील उत्पादित करून दाखवला आहे.
म्हणजेच पावसाळी हिवाळी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात सोयाबीनची शेती या प्रयोगशील शेतकऱ्याने करून दाखवली आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा देखील पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष उल्लेखनीय अशी की, या तीनही हंगामात सोयाबीनच्या उत्पादनाबाबत फारसा फरक पाहायला मिळालेला नाही. म्हणजेच सोयाबीनचा एकरी उतारा या ठिकाणी या प्रयोगशील शेतकऱ्यांना समाधानकारक लाभला आहे.
गजानन भावरक असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी सर्वप्रथम खरीप हंगामात म्हणजेच पावसाळ्यात सोयाबीनची पेरणी केली. पावसाळी हंगामातील पिकाची काढणी झाल्यानंतर हिवाळी हंगामात पुन्हा सोयाबीनची पेरणी करण्यात आली. हा देखील प्रयोग यशस्वी झाला म्हणून त्यांनी उन्हाळी हंगामात पुन्हा सोयाबीनची पेरणी केली. तेव्हाही त्यांना चांगले उत्पादन मिळाले. उत्पादकतेमध्ये तफावत नसल्याने शाश्वतं उत्पन्न देणार हे पीक बारामाही उत्पादित करण्याकडे आता इतर शेतकऱ्यांचा कल देखील वाढू लागला आहे.
निश्चितच एकच पीक वारंवार घेणे कितपत योग्य आहे हा तर एक विश्लेषणात्मक विषय राहणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीला या शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला असून या प्रयोगाची दखल इतर शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे आणि तीनही हंगामात सोयाबीन पेरणीसाठी आता शेतकरी पुढे सरसावले आहेत.
गजानन यांचा हा प्रयोग निश्चितच कौतुकास्पद असला तरी देखील असा प्रयोग करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांचा एकदा सल्ला घेणे, याचा जमिनीवर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना याबाबत सखोल अशी माहिती जाणून घेणे शेतकऱ्यांच्या हिताचे राहणार आहे. वारंवार एकाच पिकाची पेरणी केली तर जमिनीचा पोत खालावू शकतो असं काही जाणकार नमूद करतात. अशा परिस्थितीत असा काही विशेष प्रयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञ लोकांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी जरुरीचे ठरणार आहे.