Soybean Price : देशात गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने या हंगामात सोयाबीन पेरा वाढला आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही विक्रमी दर मिळेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास सोयाबीन दर पाहायला मिळत आहेत. बाजारात अजूनही भाव स्थिरच असल्याने शेतकरी बांधव संभ्रमात सापडले आहेत.
विशेष म्हणजे सध्याच्या दरात शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करणे परवडत नसल्याने बाजारात आवक देखील कमी आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरू आहे. मात्र येत्या काही दिवसात सोयाबीन दर वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. निश्चितच दरवाढीची आशा बाळगून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.
जाणकार लोकांच्या मते आता चीनमध्ये सोयाबीनची मागणी वाढत आहे. शिवाय प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्जेंटिना मध्ये सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे. खरं पाहता संपूर्ण जगात सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत अर्जेंटिना हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. अमेरिका ब्राझील आणि यानंतर अर्जेंटिना याचाच नंबर लागतो. अशा परिस्थितीत तेथे सोयाबीन उत्पादन घटणार असल्याने मागणीनुसार पुरवठा होणार नाही असं काही जाणकारांनी नमूद केला आहे.
अर्जेंटिना मध्ये सध्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकवला जातो त्या ठिकाणी कमी पाऊस पडला आहे. त्या ठिकाणी उद्भवलेली ही दुष्काळी परिस्थिती कुठे ना कुठे पिकासाठी घातक ठरत आहे. जाणकारांच्या मते अर्जेंटिना मध्ये पाऊस कोसळत आहे मात्र पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी सध्या कोसळत असलेला पाऊस हा पुरेसा नसून अजून पावसाची तेथे शेतकरी वाट पाहत आहेत.
अशा परिस्थितीत त्या ठिकाणी यंदा सोयाबीन उत्पादन घटणार आहे. आतापर्यंत अर्जेंटिनामध्ये 520 लाख टन सोयाबीन उत्पादन होणार असल्याचा अंदाज होता मात्र आता या नव्याने तयार झालेल्या परिस्थितीमुळे त्या ठिकाणी 420 लाख टन सोयाबीन उत्पादन निघेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या तयार झालेल्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दराला आधार मिळत आहे, मात्र दरात होणारी चढ-उतार अजूनही कायमच आहे.
असे असले तरी जाणकार लोकांनी, आगामी काळात या परिस्थितीमुळे दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या सोयाबीनला देशांतर्गत पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर बाजारात मिळत असून प्रक्रिया प्लांट चे दर हे पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशे दरम्यान पाहायला मिळत आहेत.
मात्र चीनमध्ये वाढणारी मागणी आणि अर्जेंटिना मध्ये पडलेला दुष्काळ यामुळे जागतिक बाजारात सोयाबीन दराला आधार मिळेल आणि याचा आपल्या देशातील बाजारात देखील सकारात्मक असा परिणाम पाहायला मिळणार असून यामुळे जवळपास 200 ते 300 रुपयांची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञ लोकांकडून बांधण्यात आला आहे.