यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढू शकते, बाजार भाव कसे राहणार? तज्ज्ञांचा अंदाज सांगतो की….

देशातील सोयाबीन उत्पादन वाढणार असल्याने याचा थेट बाजारभावावर विपरीत परिणाम होईल असे आत्तापासूनच जाहीर करता येणार नाही. गेल्या तीन वर्षांचा विचार केला असता सोयाबीनला ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ मध्ये ५९८० रुपये प्रतिक्विंटल, ऑक्टोवर ते डिसेंबर २०२२ मध्ये ५४२५ रुपये प्रतिक्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये ४८५४ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.

Tejas B Shelar
Published:
Soybean Rate 2024

Soybean Rate 2024 : यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढणार असा अंदाज नुकताच समोर आला आहे. यामुळे यावर्षी बाजारात सोयाबीनला काय दर मिळणार हा मोठा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट असतानाही बाजारात मालाला अपेक्षित भाव मिळाला नव्हता. त्यामुळे जर यंदा वर्तवलेल्या अंदाजानुसार सोयाबीनचे उत्पादन वाढले तर बाजार भाव कसे राहणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सन 2024 25 या वर्षात सोयाबीनचे उत्पादन आठ टक्क्यांनी वाढणार अशी शक्यता आहे. यावर्षी तब्बल 128 लाख टन एवढे उत्पादन होणार असा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 8% अधिक आहे.

उत्पादन वाढले तर बाजार भाव दबावात येतात हे बाजाराचे समीकरण आहे. मात्र सोयाबीनचे बाजार भाव वेगवेगळ्या घटकांवर आधारित असतात. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेलबिया पिक असल्याने याचे देशांतर्गत बाजार भाव जागतिक उत्पादन, जागतिक बाजारातील तेजी मंदी या घटकांवर ठरत असतात.

सोबतच अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, चीन या देशांमधील उत्पादन अन सोया तेलाच्या किमती, सोयापेंडच्या किमती, खाद्यतेलाच्या किमती, मागणी व पुरवठा अशा वेगवेगळ्या घटकांवर देखील सोयाबीनचे बाजार भाव अवलंबून असल्याचे मत अभ्यासकांनी वर्तवले आहे.

यामुळे फक्त देशातील सोयाबीन उत्पादन वाढणार असल्याने याचा थेट बाजारभावावर विपरीत परिणाम होईल असे आत्तापासूनच जाहीर करता येणार नाही. गेल्या तीन वर्षांचा विचार केला असता सोयाबीनला ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ मध्ये ५९८० रुपये प्रतिक्विंटल, ऑक्टोवर ते डिसेंबर २०२२ मध्ये ५४२५ रुपये प्रतिक्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये ४८५४ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.

म्हणजेच गेल्या वर्षी सोयाबीनला बाजारात 2021 आणि 2022 च्या तुलनेत कमी दर मिळाला आहे. दुसरीकडे याहीवर्षी सोयाबीनचे बाजार भाव साडेपाच हजाराच्या आतच राहू शकतात असा अंदाज समोर आला आहे. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यान सोयाबीनला 4700 ते 5200 या दरम्यान दर मिळू शकतो असे भाकीत वर्तवले जात आहे.

मात्र हा फक्त अंदाज आहे. सोयाबीन बाजारभावावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये वेळोवेळी बदल होत गेलत तर किमती देखील कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्षात सोयाबीनची आवक वाढल्यानंतर सोयाबीनला काय दर मिळणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe