State Employee HRA News : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगली कामगिरी करता आली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असे वाटत आहे.
दुसरीकडे, महायुतीने लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत आता राज्यातील सर्वसामान्यांसाठी मोठमोठ्या योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. यामुळे सध्या या योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्ग करण्यात आले आहेत.
मात्र आता या योजनेवरून शिंदे सरकारला विरोधकांकडून घेरले जात आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना निधी अभावी घरभाडे भत्याला मुकावे लागणार असल्याची शक्यता आहे.
ते म्हणालेत की लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांचा पैसा वर्ग केला जात आहे. या योजनेमुळे अन्य योजनांचा पार खेळखंडोबा झाला आहे. इतर अन्य महत्वाच्या योजनांचा निधी हा लाडकी बहीण ला वर्ग केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे.
एवढेच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पगारासाठीही निधी उपलब्ध होत नसल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे. या योजनेमुळे सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसा शिल्लक नाहीये. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता कापून पगार दिला जाईल अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ता पक्षांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडूनही सरकारला घेरण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
कशी आहे लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपये मिळणार आहेत.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरवली जाणार आहे.
तथापि याचा लाभ फक्त 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांनाच मिळणार आहे. सोबतच याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. परराज्यात जन्मलेल्या अन राज्यात फक्त रोजगारासाठी आलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
पण, ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिला याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे.