State Employee News : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एक मोठी माहिती दिली आहे. फडणवीस यांनी ग्रामीण व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. फक्त मानधन वाढच नाही तर पोलीस पाटील यांची रिक्त पदे देखील लवकरच भरली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे यासाठी लवकरच शासकीय समितीची स्थापना होणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता गेल्या अनेक महिन्यापासून पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ व्हावी, पोलीस पाटील ची रिक्त पदे भरली जावेत यासाठी मागणी जोर धरत आहे. याच संदर्भात विधान परिषदेत भाजपा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
यालाच उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. खरं पाहता पोलीस पाटील यांना 2019 मध्ये मानधन वाढीचा लाभ देण्यात आला आहे. 2019 पर्यंत पोलीस पाटील यांना मात्र तीन हजार रुपयांच मानधन मिळत होतं. हे मानधन अतिशय तुटपुंज होत म्हणून 2019 पूर्वी अनेक संघटनांकडून पोलीस पाटील यांचे मानधन वाढवावे अशी मागणी झाली होती.
याच पार्श्वभूमीवर 2019 मध्ये पोलीस पाटील यांचे मानधन सहा हजार पाचशे रुपये प्रतिमहा करण्यात आले. आता यामध्ये पुन्हा एकदा वाढ केली जावी अशी मागणी पाहता फडणवीस यांनी यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे ग्राम पोलीस पाटील अधिनियमात सुधारणा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आता या समितीची लवकरच या संदर्भात एक बैठक होणार आहे.
यासोबतच कोविड महामारीच्या काळात सेवा बजावतांना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटील यांना मदत देण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली असून जर एखाद्या प्रकरणात ही मदत मिळाली नसेल तर त्याची फेर तपासणी केली जाईल आणि वंचित प्रकरणात लवकरात लवकर मदत दिली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
निश्चितच शिंदे फडणवीस सरकारने पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील ग्रामीण पोलीस व्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक पुन्हा एकदा उभारी घेईल आणि यामुळे ग्रामीण व्यवस्था आणखी सुरळीत होईल. पोलीस पाटील यांना तुटपुंज मानधन मिळत असल्याने यामध्ये वाढ झाल्यास त्यांना आपली सेवा बजावताना अजूनच समाधान वाटेल यात तीळ मात्र देखील शंका नाही.