Subhash Desai On Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून सरकारी कर्मचारी आक्रमक आहेत. 2004 नंतरच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन योजनेत अनेक दोष असून ही योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसल्याचा आरोप सातत्याने केला जातोय.
यामुळे ही योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी योजना लागू झाली पाहिजे अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान याच जुनी पेन्शन योजने संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सुभाष देसाई यांनी लोकप्रतिनिधींना म्हणजेच आमदार, खासदारांना किती पेन्शन मिळते याचा एक आकडा सार्वजनिक केला आहे.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती पेन्शन मिळू शकते याबाबत ही माहिती दिली आहे. यामुळे देसाई यांनी लोकप्रतिनिधींच्या पेन्शन संदर्भात मांडलेली ही आकडेवारी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
काय म्हटले देसाई?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल अर्थातच 15 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्यस्तरीय महाधिवेशन कोपरगाव येथे संपन्न झाले. याच अधिवेशनावेळी बोलतांना उबाठा शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आमदार खासदारांच्या पेन्शनबाबत भाष्य केले.
या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर तसेच जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर यांनी हजेरी लावली होती. यावेळी देसाई यांनी मी बावीस वर्षे आमदार राहिलो आहे.
पंधरा वर्षे विधानसभेचा आणि सात वर्ष विधान परिषदेचा आमदार राहिलो आहे. म्हणून मला प्रत्येक महिन्याला 84 हजार रुपयांची पेन्शन मिळते. आता आम्हाला जर पेन्शन मिळत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांना का नको? असा प्रश्न उपस्थित करत देसाई यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित केली.
यावेळी देसाई यांनी एकच मिशन जुनी पेन्शन असं म्हणतं जे आधी मिळत होतं तेच मागतोय, यामुळे ही न्याय मागणी असल्याचे म्हटले. पेन्शन मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार असून उद्धव ठाकरे हा प्रश्न सोडवतील असा विश्वास असल्याचे देसाई यांनी सांगितले. वृद्धापकाळात कुणापुढेच हात पसरवण्याची वेळ येऊ नये यासाठी जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे.
कुणाला किती पेन्शन मिळते?
यावेळी सुभाष देसाई यांनी त्यांना किती पेन्शन मिळते हे तर सांगितले शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती पेन्शन मिळणार याचीही आकडेवारी जाहीर केली.
देसाई म्हटलेत की, जर पंतप्रधान मोदी घरी बसले असते तर त्यांना आता 90 हजाराची पेन्शन मिळाली असती. तसेच, रिक्षाच्या तीन चाकाप्रमाणे राज्यातील सरकार असून तीन महिन्याने शिंदे निवृत्त होतील तेव्हा त्यांना ८४ हजार, देवेंद्र फडणवीस निवृत्त होणार तेव्हा त्यांना ८० हजार अन अजित पवार यांना ९० हजार पेन्शन मिळणार आहे.