स्पेशल

कौतुकास्पद ! प्रगतीशील शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाटा देत राजमा पिकातून मिळवले लाखोंचे उत्पादन

Published by
Ajay Patil

Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते भीषण दुष्काळाचे आणि काळीज पिळवटणार शेतकरी आत्महत्यच चित्र. मात्र आता काळाच्या ओघात मराठवाड्याचं रुपडं पालटू लागल आहे. हवामान बदलामुळे आणि जलसंधारणाच्या कामामुळे मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता आधीच्या तुलनेत अधिक झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेमुळे आता शेती व्यवसायात वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग पहावयास मिळत आहेत.

या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता चांगली कमाई देखील होत आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात देखील असाच एक नवीन प्रयोग शेतकऱ्याने केला आहे. मौजे आडस येथील प्रगतिशील शेतकरी रमेश खाडे यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत राजमा पिकाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे मात्र 50 गुंठे शेत जमिनीत या पिकाच्या लागवडीतुन रमेश खाडे या प्रगतीशील शेतकऱ्याला लाखो रुपयांची कमाई झाली आहे.

यामुळे शेतीमधला हा बदल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपलं वेगळं पण सिद्ध केलं आहे. रमेश खाडे यांनी आपल्या 50 गुंठ्यात राजमा या पिकाची लागवड केली. त्यांनी राजमा पिकाच्या वरून या जातीची लागवड केली. पिकासाठी पाणी व्यवस्थापन करणे हेतू स्प्रिंकलर चा वापर करण्यात आला. तसेच फ्लड पद्धतीने म्हणजेच भुई पाटाने देखील याला पाणी भरावे लागले आहे.

भुई पाटा पद्धतीने 6 वेळा आणि स्प्रिंकलर ने दोन वेळा या पिकाला पाणी दिले. सोबतच खत व्यवस्थापन म्हणून डीएपीची एक बॅग लावली आणि दोन फवारण्या त्यांनी केल्या. या 50 गुंठे शेत जमिनीत पेरणी पासून ते मळणी पर्यंत 14 ते 16 हजारापर्यंतचा खर्च आला. यातून त्यांना 16 क्विंटल इतकं उत्पादन मिळालं असून सहा हजार तीनशे चा भाव लाभला आहे. म्हणजेच एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न त्यांना यातून मिळालं आहे. खर्च वजा जाता 90 हजारापर्यंतची कमाई त्यांना यातून झाली आहे.

निश्चितच शेतीमध्ये केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. एकीकडे बाजारात सोयाबीन कापूस कांदा यांसारख्या नगदी पिकांना अतिशय कवडीमोल दर मिळत आहे तर दुसरीकडे राजमासारख्या अपारंपारिक पिकांची लागवड करून रमेश खाडे यांसारखे प्रगतिशील शेतकरी शेतीतून लाखोंची कमाई करत आहेत. निश्चितच बाजारपेठेचा आढावा घेत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात हेच या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil