Success Story:- परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीशी दोन हात करत ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि जे हातात शिल्लक आहे त्याचा व्यवस्थित वापर करून यशाचे शिखर गाठण्यात खूप महत्त्व असते. परंतु बरेच व्यक्ती आपण पाहतो की परिस्थिती पुढे इतके हात टेकतात की परिस्थितीला घट्ट चिकटून बसतात व अगदी निष्क्रिय होऊन परिस्थितीला दोष देत असतात.
अशी व्यक्ती किंवा असे लोक काहीही करू शकत नाही. परंतु असे काही विद्यार्थी विद्यार्थिनी,काही व्यक्ती आपल्याला दिसून येतात की आहे त्या परिस्थितीत मार्ग काढून मोठ्या कष्टाने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात व उत्तुंग यश संपादन करतात. याच पद्धतीने अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना देखील राजस्थान मधील कोटा येथील प्रेरणा या तरुणीने प्रचंड प्रमाणात अभ्यास करून भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा अर्थात नीट उत्तीर्ण केली आहे. त्यांचीच यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत देखील उत्तीर्ण केली NEET परीक्षा
परिस्थिती पुढे हात टेकण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करत जो यशाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी प्रयत्न करतो अशा व्यक्तींना यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे राजस्थानमधील कोटा येथील प्रेरणा या होय. त्यांनी भारतातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक मानली जाणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
जेव्हा प्रेरणा यांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा ती तिच्या भावंडांसोबत कोटा राजस्थान या ठिकाणी राहत होती. परंतु वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. दुसरी विपरीत गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार देखील होता आणि 27 लाख रुपये कर्ज देखील होते.
अशाप्रसंगी चार भावंडांची काळजी आणि 27 लाख कर्ज फेडण्याची जबाबदारी प्रेरणा यांच्यावर येऊन पडली.कर्ज परतफेड करता न आल्यामुळे त्यांना त्यांचे घर देखील विकावे लागले. तसेच मध्ये कोविडची साथ पसरली व त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
परंतु या अडथळ्यांवर मात करत मार्ग काढण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले व काहीही करून नीट परीक्षा उत्तीर्ण करायचीच असं मनाशी पक्के केले व एका खोलीत फक्त एकच व्यक्ती बसू शकेल एवढ्या छोट्या खोलीमध्ये त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. प्रेरणा यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी दररोज दहा ते बारा तास अभ्यास केला व यश संपादन केले.
NEET मध्ये 720 पैकी मिळवले 686 गुण
प्रेरणा आणि तिचे भावंड यांची उदरनिर्वाहाचे जर साधन पाहिले तर ते त्यांच्या आईच्या नावावर येणारी दरमहा पाचशे रुपये पेन्शन एवढेच आहे. प्रेरणा यांना त्यामुळे कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे त्यांना कुठेही जायचे राहिले म्हणजे त्या सायकलवरून किंवा पायी प्रवास करत होत्या.
इतक्या विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण केली व नीट 2022 मध्ये चांगले गुण मिळवले. या परीक्षेत प्रेरणा यांना 720 पैकी 686 गुण मिळवले व उत्तीर्ण झालेल्या एकूण दीड लाख विद्यार्थ्यांपैकी त्यांचे अखिल भारतीय रॅंक ही 1033 इतकी होती. या यशाचे श्रेय देतांना प्रेरणा म्हणतात की त्यांचे वडील हे त्यांचे सर्वात मोठे प्रेरणा होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवले होते की कितीही आर्थिक ताणतणाव असला तरी स्वप्न साकार करण्यापासून थांबायचे नसते.
अशा पद्धतीने विपरीत आर्थिक परिस्थिती असताना देखील प्रेरणा यांनी मिळवलेले यश खरच कौतुकास्पद आहे.